एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील दुकानाचा सज्जा जमीनदोस्त

धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) आवारातील संपूर्ण कांदा-बटाटा मार्केटच्या इमारती अतिधोकादायक घोषित केल्या आहेत. पावसाळ्यात या इमारतींमधील छतांचे प्लास्टर पडण्याच्या घटना वारंवार घडत असून, १७ जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास एफ विंग १२९ आणि १३० या दोन गाळ्यांच्या सज्जा तसेच पत्रा शेड पडण्याची घटना घडली. सदर घटना रात्री घडल्याने सुदैवाने या घटनेत वित्तहानी अथवा मनुष्यहानी टळली आहे. मात्र, या घटनेने एपीएमसी बाजार आवारातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.


मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती कांदा-बटाटा बाजारातील गाळे, प्रशासकीय इमारत तसेच मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारत  नवी मुंबई महापालिका तर्फे सन-२००३ पासून अतिधोकादायक जाहीर करण्यात आली. विशेष म्हणजे सदर घोषणा झाली त्याच दिवशी तत्कालीन गृहमंत्री दिवंगत आर. आर. पाटील वाशी येथे एका शासकीय कार्यक्रमासाठी आले होते. त्याच वेळी एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील मोठी भिंत कोसळल्याने चांगलीच खळबळ माजली होती. अत्यंत जर्जर अवस्थेतील एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील  इमारतींचा पुनर्विकास व्यापाऱ्यांच्या अंतर्गत वादात अडकला आहे. परिणामी, या इमारती अतिधोकादायक घोषित केल्यानंतर येथील व्यापाऱ्यांची पर्यायी व्यवस्था न केल्याने येथील व्यापारी आपला जीव मुठीत धरुन येथे व्यवसाय करत आहेत. दुसरीकडे एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील इमारती धोकादायक असल्याने पावसाळ्यात येथील छताचे प्लास्टर पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. १७ जुलै रोजी रात्री येथील गाळा नंबर एफ १२९ आणि १३० या गाळ्यांसमोरील सज्जा आणि पत्रा शेड पडण्याची घटना घडली आहे. दुर्घटना घडली त्यालगतचा गाळा कांदा-बटाटा मार्केट संचालक अशोक वाळुंज यांच्या मालकीचा आहे. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, या घटनेने एपीएमसी बाजार आवारातील धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा व्यापाऱ्यांना सतावू लागला आहे.
---------------------------------------------------
एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील एफ १२९ आणि १३० या गाळ्यांसमोरील नमुना ठेवण्याच्या जागेतील सज्जा आणि पत्रा शेड पडण्याची घटना १७ जुलै रोजी रात्री घडली आहे. सदर घटनेत कुणीही जखमी झाले नसून, सुरक्षा कारणास्तव तो भाग प्रतिबंधित केला आहे. त्या ठिकाणी सध्या टेकू लावण्याचे काम सुरु आहे. - मेहबूब व्यापारी, अभियंता - कांदा बटाटा मार्केट, मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती, वाशी. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेतील महिला अधिकारी-कर्मचारी यांची मोफत आरोग्य तपासणी