नालेसफाई कामांना नवी मुंबईत वेग
नवी मुंबई : पावसाळापूर्व कामे विहित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश विशेष आढावा बैठक घेत नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी मागील आठवड्यात संबंधितांना दिले आहेत. त्या अनुषंगाने सर्वच विभागांमार्फत सुरु असलेल्या कामांना वेग आलेला आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पूर्वेकडील डोंगररांगांपासून पश्चिमेकडील खाडीला मिळणारे नैसर्गिक नाले असून ते पावसाळी पाणी विनाअडथळा वाहून जाण्यासाठी साफ असावेत यादृष्टीने सदर नाल्यांसह शहराच्या अंतर्गत असलेल्या मोठ्या नाल्यांचीही पावसाळापूर्व सफाई सुरु आहे.
नमुंमपा क्षेत्रात ७७ लहान-मोठे नैसर्गिक नाले असून ‘घनकचरा व्यवस्थापन विभाग'मार्फत सुरु असलेल्या सफाई कामांची अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी संयुक्तपणे पाहणी करत या कामांना वेग देण्याच्या आणि खोलवर सफाई करण्याच्या सूचना केल्या. याशिवाय सायन-पनवेल महामार्गावर ३ नाल्यांची अभियांत्रिकी विभागामार्फत सफाई करण्यात येत आहे.
नाल्यांमधून जेसीबी द्वारे काढला जाणारा गाळ तसेच काही नाल्यांच्या प्रवाहातील गाळ काढण्याची आणि काठांवर मनुष्यबळ लावून झाडे-झुडपे यांची सफाई केली जात आहे. यानंतर कचरा काठांवर ठेवला जात असून गाळ काहीसा सुकून वाहतूक करण्यायोग्य झाल्यानंतर तत्परतेने त्या ठिकाणाहून हलविण्याची खबरदारी घ्यावी. याबाबत हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश अतिरिवत आयुवत सुनिल पवार यांनी संबंधितांना दिले.
सदर पाहणीमध्ये वाशी सेवटर-१७ नाला, सेवटर-१२ नाला, सेवटर-२९ नाला तसेच सेवटर-१२ आणि सेवटर-८ येथील धारण तलाव त्याचप्रमाणे कोपरखैरणे येथील आलोक नाला, सेवटर-२ नाला, घणसोली-कोपरखैरणे नाला या नाले स्वच्छतेची पाहणी करण्यात आली. नाल्यांची साफसफाई, धारण तलावांचे पलॅप गेटस्, पंपिंग मशिनरी, स्ट्रेन्चेस अशा विविध कामांची अतिरिवत आयुवत पवार आणि शहर अभियंता देसाई यांनी बारकाईने पाहणी केली.
दरम्यान, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पावसाळापूर्व कामांसाठी १५ मे ची डेडलाईन दिली आहे. त्याअनुषंगाने विहित वेळेत काम पूर्ण करण्याचे संबंधित विभागांनी नियोजन करावे आणि विशेषत्वाने नैसर्गिक नालेसफाईच्या कामांना वेग द्यावा, असे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार आणि शहर अभियंता संजय देसाई यांनी पाहणीवेळी दिले.
सदर पाहणी प्रसंगी संबंधित विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता, स्वच्छता अधिकारी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.