सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱ्यावर कारवाई

नवी मुंबई : सिडकोने संपादित केलेल्या जमीनीवर व भूखंडावर मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानिकारक असलेले डेब्रीज टाकणाऱया डंपर चालकांची सिडकोकडून धरपकड सुरुच आहे. गुरुवारी दुपारी सिडकोच्या पथकाने पनवेल येथील कुंडेवहाळ सर्व्हे क्र. 37  या परिसरात डेब्रीज टाकण्याच्या तयारीत असलेल्या 4 डंपर आणि जेसीबी आणि डोजर पकडण्याची कारवाई केली. तसेच त्यावरील 2 चालकांना ताब्यात घेतले आहे.

सिडको महामंडळाने संपादित केलेल्या भूखंडावर अनधिकृतपणे मोठया प्रमाणात डेब्रीज टाकण्यात येत असून सदरचे डेब्रीज हे मानवी आरोग्यास धोकादायक व पर्यावरणास हानीकारक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे सिडकोच्या भूखंडावर टाकण्यात येणाया अनधिकृत डेब्रीजला आळा घालण्याच्या दृष्टीने सिडकोचे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे दक्षता तपास अधिकारी, सुरक्षा विभाग, अभियांत्रीकी विभाग व पोलीस पथकाकडून सिडकोच्या जमिनीवर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणाऱया डंपर चालकांविरोधात विशेष मोहीम सुरु करण्यात आली आहे.  

गुरुवारी दुपारी 2 ते 6 वाजण्याच्या सुमारास पनवेल परिसरातील कुंडेवहाळ येथील सर्व्हे क्र. 37 मध्ये सिडकोच्या जमिनीवर मानवी आरोग्यास हानिकारक असलेले डेब्रिज टाकण्यात येत असल्याची माहिती सिडकोच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सिडकोच्या  पथकाने कुंडेवहाळ येथे धाव घेतली असता, डेब्रीजने भरलेल्या 4 डंपर मधील मानवी आरोग्यास व हानिकारक असलेले डेब्रीज विनापरवाना खाली करुन ते जेसीबी व डोझरच्या सहाय्याने लोटत नेले जात असल्याचे आढळून आले.

 त्यानंतर सिडकोच्या पथकाने 4 डंपर, जेसीबी आणि डोझर ताब्यात घेतले. यातील 2 डंपर वरील चालक बबलु यादव (34) व राकेशकार सोनकर (39) या दोघांना ताब्यात घेतले आहे.  इतर दोन डंपर, जेसीबी आणि जोझर वरील चालक फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या कारवाई नंतर सिडकोच्या पथकाने बेकायदेशीरपणे डेब्रिज टाकणाऱ्या विरोधात पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 १०-१० तास वेटींग करुनही तिकीटाची नो-गॅरंटी