नवी मुंबईकर कवी साहेबराव ठाणगे यांचा काव्यप्रवास उलगडणार
वाशीच्या साहित्य मंदिरात २२ तारखेस काव्यगायन आणि दिलखुलास गप्पांची मैफल
नवी मुंबई : सुप्रसिध्द ग्रामीण कवी साहेबराव ठाणगे यांच्या काव्य गायनाबरोबरच त्यांच्या एकूण साहित्य निर्मितीबद्दल आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालूक्यामधील करंदी हे लहानसे खेडेगाव ते मुंबई बँकेचा सरव्यवस्थापक पदापर्यंतच्या प्रवासाविषयी त्यांच्याशी येत्या शनिवारी २२जुलै रोजी सायंकाळी ६.३० वाजता वाशीच्या साहित्य मंदीर सभागृहात सामाजिक कार्यकर्त्या, अमरजा चव्हाण हितगुज साधणार असून सोबतीला कसदार कवितांचे काव्यगायन आणि दिलखुलास गप्पांचीही मैफल रंगणार आहे.
सदर कार्यक्रमाची संकल्पना ज्येष्ठ कवी प्रा. अशोक बागवे यांची असून प्रा. बागवे श्री. ठाणगे यांचा काव्य प्रवास उलगडणार आहेत. मराठी साहित्य, संस्कृती व कला मंडळाने आयोजीत केलेला हा कार्यक्रम रसिकांना विनामुल्य असून नवी मुंबईकरांनी त्याचा आनंद अवश्य घ्यावा, असे आवाहन, मंडळाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी यांनी केले आहे.