मोदी सरकार ४ जूननंतर रिटायर्ड -उध्दव ठाकरे
नवी मुंबई: महाराष्ट्र कोणावर वार करत नाही; मात्र जर कोणी वार केला तर वाघनखे बाहेर काढतो, असा ‘महाराष्ट्र'चा इतिहास आहे. महाराष्ट्र जिंकण्यासाठी औरंगजेब २७ वर्षे झुंजला. मात्र, त्याला पुन्हा आग्रा पाहता आला नाही. त्याच धर्तीवर महाराष्ट्र सध्या देशात असंतोषाचा जनक बनला असून ‘शिवसेना'च्या मशालीमुळे हुकूमशहास्वराच्या बुडाला आग लागणार आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांचे सरकार येथे ४ जून नंतर रिटायर्ड नाहीतर गेट आऊट होणार आहे, असा टोला शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नवी मुंबईत लगावला.
दरम्यान, ‘ठाणे'ची शिवसेना आणि ‘शिवसेना'चे ठाणे असे नाते फार जुने आहे. मी ते नाते सांगण्यासाठी येथे आलो नाही तर गद्दारांची मस्ती उतरवण्यासाठी आलो आहे. तुम्हीही त्यासाठी आलात ना? असा प्रश्न शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी उपस्थित जनसमुदायाला विचारला.
ठाणे लोकसभा मतदारसंघातील ‘इंडिया-महाविकास आघाडी'चे उमेदवार राजन विचारे यांच्या प्रचारासाठी ५ मे रोजी ऐरोली येथील श्रीराम विद्यालयाच्या भव्य मैदानावर प्रचारसभाचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना उध्दव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर अक्षरशः प्रहार केला.
याप्रसंगी सौ. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उमेदवार खासदार राजन विचारे, ‘काँग्रेस'चे नेते मुझपफर हुसेन, ‘राष्ट्रवादी-शरदचंद्र पवार गट'चे आमदार जितेंद्र आव्हाड, माजी आमदार विद्या चव्हाण, दिपक निकाळजे, शिवसेना सचिव वरुण सरदेसाई, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे, ‘काँग्रेस'चे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख द्वारकानाथ भोईर, वि्ील मोरे, जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, ‘आप'चे दिनेश ठाकूर, माजी उपमहापौर रमाकांत म्हात्रे, मोहन मढवी, ‘महिला काँग्रेस'च्या जिल्हाध्यक्षा सौ. पुनम पाटील, ‘राष्ट्रवादी महिला काँग्रेस'च्या जिल्हाध्यक्षा सौ. सलुजा सुतार, सौ. विनया मढवी, अंकुश सोनावणे, आदि उपस्थित होते.
‘इंडिया आघाडी'चे सरकार येताच तुमची जागा तुरुंगात...
स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असे विधान लोकमान्य टिळक यांनी ‘इंग्रज सरकार'च्या विरोधात केले होते. त्यावेळी ते असंतोषाचे जनक ठरले होते. आज नरेंद्र मोदी आणि अमित शहा या हुकूमशहांच्या विरोधात महाराष्ट्र असंतोषाचे जनक ठरला आहे. आजच्या सरकारला डोके नाही, त्यांच्याकडे फक्त खोके आहेत. त्यामुळे सरकार डोकेबाज नाहीतर धोकेबाज आहे. तुम्ही कितीही जुलूम, दडपशाही करा; पण एम. के. मढवी सारखे निष्ठावंत तुरुंगात गेले तरी डगमगणार नाहीत. तुम्ही शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यासारख्या निष्ठावांतांना ज्या तुरुंगात टाकले आहे, त्या तुरुंगाच्या भिंती किती भक्कम आहेत त्या मला पाहिजे आहे. कारण देशात ‘इंडिया आघाडी'चे सरकार आल्यानंतर तुमची जागा या तुरुंगात नक्की आहे, असाही इशारा उध्दव ठाकरे यांनी यावेळी दिला.
४ जून रोजी नरेंद्र मोदी रिटायर्ड...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षात देश फक्त लुटलाच नाही, तर बरबाद केला आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि ‘महाविकास आघाडी'च्या सभांना राज्यभरात मोठा प्रतिसाद मिळत आहे. लाखो लोक सभांसाठी जमत आहेत. नागरिकांची गर्दी येत्या ४ जून रोजी नरेंद्र मोदी यांना रिटायर्ड केल्याशिवाय राहणार नाही, असा घणाघात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सभेत केला.
नरेंद्र मोदी निराश, हताश आणि हतबल माणूस बनले आहेत. तुम्ही ‘शिवसेना'चा धनुष्यबाण चोरला, आता तुमचे कमळ महाराष्ट्र राहू देणार नाही. भाजप राजकीय नकाशावरुन नष्ट होणार आहे. अयोध्या मध्ये नरेंद्र मोदी रोड शो करीत आहेत. पण, त्यांनी लक्षात ठेवावे, अयोध्या तील राम आमच्या पाठीशी उभा आहे. आजची सभा श्रीराम विद्यालयाच्या प्रांगणात होत आहे. हेच आमचे श्रीरामाची नाते आहे. शिवसेना, गुजरातच्या २ चोरांनी फोडण्याचा प्रयत्न केला तरी शिवसेना खतम होऊ शकली नाही. धनुष्यबाण चोरुन तुम्ही ज्या गोल्डन यांच्या हातात दिलाय, त्या गोल्डन यांची एक्सपायरी डेट आता संपलेली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर देशात परिवर्तन होणार आहे. त्यामुळे हुकूमशाहांची तडफड आणि फडफड कायमस्वरुपी थांबणार आहे. झोला लेकर आया था, झोला लकर जाऊंगा, असे म्हणत मोदी यांना त्यांच्या इच्छेनुसार हिमालय जावे लागणार आहे, असे टिकास्त्र खासदार संजय राऊत यांनी यावेळी सोडले.
बांडगुळांमुळे राजकारणाचे वाटोळे...
‘ठाणे'चे गद्दार यापूर्वीच नारायण राणे यांच्याबरोबर जाणार होते. मात्र, त्यावेळी त्यांना मी थांबवले. ती माझी आयुष्यातील फार मोठी चूक झाली. जर ती चूक घडली नसती तर आज फोडाफोडीचे राजकारण झाले नसते. राजकारणात अशी बांडगुळे तयार झाल्यामुळे राजकारणाचे वाटोळे झाले आहे. मात्र, गद्दारांनी लक्षात ठेवावे, खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ यांची नावे कुठेच लिहिली जात नाही. तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे यांची नावे मात्र सर्वत्र लिहिली जातात. ते निष्ठावंत होते. तशीच अवस्था तुमची होणार आहे, अशी टीका ‘राष्ट्रवादी'चे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.
‘दिबां'च्या नावाचा विसर...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ'ला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याचा प्रस्ताव तत्कालीन मुख्यमंत्री पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी मंजूर केला होता. मात्र, ‘सरकार'ला ‘दिबां'च्या नावाचा विसर पडला आहे. सत्तेत आल्यानंतर त्यांनी ‘दिबां'चे नाव विमानतळाला दिले जावे, यासाठी कोणतीही प्रयत्न केले नाहीत. शिवसेना आणि महाविकास आघाडी ‘दिबां'चे नाव विमानतळाला देण्यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्याचा निर्णय ‘महाविकास आघाडी सरकार'ने घेतला होता. या ‘सरकार'च्या काळात त्याची कोणतीच अंमलबजावणी झाली नाही. सरकार जनतेच्या हितासाठी नाही तर गद्दारांच्या स्वार्थासाठी तयार झाली आहे, असा आरोप ‘ठाणे लोकसभा मतदारसंघ'मधील ‘महाविकास आघाडी'चे उमेदवार राजन विचार यांनी यावेळी केला.
याप्रसंगी माजी नगरसेवक विक्रम (राजू शिंदे), संदीप सुतार, माजी नगरसेविका सौ. हेमांगी सोनावणे, सौ. कोमल वास्कर, युवा सेना सहसचिव करण मढवी, शिवसेना महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, चेतन नाईक, ऐरोली संपर्कप्रमुख विद्याधर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, सुर्यकांत मढवी, शहरप्रमुख प्रवीण म्हात्रे, आदिंसह ‘इंडिया-महाविकास आघाडी'चे पदाधिकारी आणि हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. सदर सभेचे सूत्रसंचालन विभाग प्रमुख विलास हांडे यांनी केले.