खारघर मधील अनधिकृत ४० घरांची पक्की चाळ, २  इमारती जमीनदोस्त

खारघर : खारघर सेक्टर-२९ आणि सेवटर-३० ओवे गावलगत ‘सिडको'च्या भूखंडावर अतिक्रमण करुन उभारण्यात आलेली ४० घरांची बैठी चाळ आणि एक अनधिकृत इमारत सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाकडून १३ मार्च रोजी जमीनदोस्त करण्यात आली. दरम्यान, खारघर मध्ये प्रथमच मोठया प्रमाणात अनधिकृत बांधकाम सिडको तर्फे जमीनदोस्त करण्यात आल्यामुळे दादा मंडळींचे धाबे दणाणले आहेत.

खारघर सेक्टर-२९ आणि सेवटर-३० ओवे गाव लगत असलेल्या विद्युत वाहिनी कॉरीडोर  खाली जवळपास २ हजार चौरस मीटर भूखंडावर अनधिकृतपणे ४० घरांचे पक्के बांधकाम करण्यात आले होते. तर भूखंड क्रमांक- १७९के, १७९एच या दोन्ही ३०० चौरस मिटर क्षेत्रावर तसेच खारघर सेक्टर-३४ मधील भूखंड क्रमांक-४४ डी या भूखंडावर ८ हजार चौ.मी. जागेत अनधिकृत इमारतीचे बांधकाम  सुरु होते. ‘सिडको'च्या  धोरणांचा भंग करुन आणि  कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न घेता उभारण्यात आलेले सदर अनधिकृत पक्के बांधकामे जमीनदोस्त करण्यात आले. तसेच खारघर  सेक्टर-८ आणि सेवटर-९ मधील कांदळवन क्षेत्रामध्ये जलवाहिनी आणि एअर वॉल मधून पाण्याची चोरी केली जात असल्याची तक्रार प्राप्त होताच सदर ठिकाणी पाहणी करुन पाणी चोरीसाठी तीन ठिकाणांवर उभारण्यात आलेले तात्पुरते बांधकाम जमीनदोस्त करुन  अनधिकृत पाणी जोडणी सिडको द्वारे बंद करण्यात आली.

सदर कारवाई ‘सिडको'चे मुख्य दक्षता अधिकारी सुरेश मेंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाई वेळी सिडको अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे अधिकारी, खारघर पोलीस अधिकारी-कर्मचारी, सिडको पोलीस पथक, सिडको  सुरक्षा रक्षक आणि महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षक उपस्थित होते.

सिडको अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार खारघर परिसरातील गावात काही दादा मंडळींनी ‘सिडको'च्या जागेवर अतिक्रमण करुन अनधिकृत बांधकाम उभारले आहे. याविषयी सर्व माहिती घेवून लवकरच ‘सिडको'च्या जागेवर अतिक्रमण करुन उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर सिडको तर्फे कारवाई करण्यात येणार असल्याचे समजते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेची आजवरची सर्वात उच्चांकी वसुली