जुहूगावातील तलावाची गटारगंगा

वाशी : वाशी मधील जुहूगावातील तलावात शेवाळ आणि मल साचल्याने या तलावाची गटारगंगा झाली आहे. त्यामुळे येणाऱ्या माघी गणेश जयंतीला या तलावात श्रीमूर्ती कशा विसर्जित करणार?, असा सवाल करत या तलावाची तात्काळ सफाई करावी, अशी मागणी ‘जुहूगाव ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी केली आहे.

मार्च २०२३ मध्ये नवी मुंबई महापालिकेने जुहूगाव तलावासाठी तब्बल २४ लाख रुपये खर्च करुन तलावाची दुरुस्ती आणि साफसफाईचे काम पूर्ण केले. त्यानंतर काही महिन्यातच गणेश उत्सव दरम्यान तलावातील पाणी दूषित, दुर्गंधी होऊन तलावात शेवाळ जमा झाली. यावेळी नागरिकांनी असंतोष व्यक्त केल्यामुळे नवी मुंबई महापालिकेने फक्त शेवाळ काढण्याचे काम पूर्ण केले. मात्र, तलावातील पाणी दुर्गंधीमयच राहिले. पुन्हा काही महिन्यात तलावातील पाणी दूषित आणि दुर्गंधीमय झाल्यामुळे डिसेंबर २०२३ मध्ये तलावातील पाणी काढून साफसफाईचे काम पूर्ण केले. आता पुन्हा एकदा जानेवारी २०२४ पर्यंत एका महिन्यातच तलावाचे पाणी दूषित, दुर्गंधीमय होऊन तलावात शेवाळ जमा झाली आहे. येत्या १३ फेब्रुवारी रोजी माघी गणेश जयंती उत्सव आहे. यादिवशी मोठ्या प्रमाणात श्री मूर्तींची प्रतिष्ठापना करुन दुसऱ्या दिवशी श्री मूर्तींचे विसर्जन केले जाते. मात्र, जुहूगावातील तलावाची सद्य परिस्थिती पाहता गणेश भक्तांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, या तलावात श्री मूर्ती कशा विसर्जीत करायच्या?, असा सवाल श्रीगणेश भवतांकउून उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, जुहूगावातील तलावाची तात्काळ साफसफाई करावी, अशी मागणी ‘जुहूगाव ग्रामस्थ मंडळ'चे अध्यक्ष हिमांशू पाटील यांनी केली आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 कॅन्सर रुग्णांसाठी १ हजारापेक्षा अधिक रक्ताची पाकीटे उपलब्ध