‘बारावी'चा निकाल ९३.३७ टक्के

नवी मुंबई : ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'मार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल २१ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला. बारावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल जाहीर करण्यापूर्वी ‘मंडळ'कडून पत्रकार परिषद घेऊन निकालाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानुसार राज्यात यंदा बारावी परीक्षेचा निकाल ९३.३७ टक्के लागला आहे. यामध्ये नेहमीप्रमाणे मुलींनी निकालावर वरचष्मा राखला, तर कोकण विभागात सर्वाधिक विद्यार्थी (९७.५१ टक्के ) उत्तीर्ण झाले.

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'कडून पुणे, नागपूर, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती नाशिक, लातूर, कोकण या ९ विभागीय मंडळात फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये राज्यभर परीक्षा घेण्यात आली होती. राज्यातील ३,३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. मराठी, हिंदी, उर्दु, इंग्रजी, गुजराती, कन्नड अशा सहा भाषांमध्ये परीक्षा घेण्यात आली होती. विज्ञान, कला, वाणिज्य, व्यावसायिक अभ्यासक्रम, आयटीआय या अभ्यासक्रमाच्या एकूण १४ लाख ३३ हजार ३७१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४ लाख २३ हजार ९७० विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यातून १३ लाख २९ हजार ६८४ विद्यार्थी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. त्यामुळे एकूण उत्तीर्णांची टक्केवारी ९३.३७ टक्के इतकी नोंदवण्यात आली. बारावी परीक्षेत एकूण १५४ विषय होते, त्यापैकी २६ विषयांमध्ये १०० टक्के गुण विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत.

बारावी परीक्षेसाठी राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे. तर बारावी परीक्षेला राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. यात ६५८१ दिव्यांग विद्यार्थी (९४.२० टक्के ) उत्तीर्ण झाले आहेत. इयत्ता १२ वी परीक्षेला नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'च्या सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांमध्ये कोकण विभागाचा निकाल (९७.५१ टक्के ) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ टक्के ) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ टक्के असून मुलांचा निकाल ९१.६० टक्के आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ टक्केने जास्त आहे.

छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थिनीला १०० टक्के गुण
छत्रपती संभाजीनगर विभागातील विद्यार्थिनीला १०० टक्के गुण मिळाले आहेत. १०० टक्के गुण मिळवलेली ती राज्यातील एकमेव विद्यार्थिनी आहे. वाणिज्य या विद्यार्थिनीला प्रत्यक्ष परीक्षेत ५८२ आणि क्रीडा गुण १८ असे एकूण ६०० पैकी ६०० गुण मिळाले आहेत, अशी माहिती ‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'चे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

राज्य मंडळाने आज बारावीचा निकाल जाहीर केला. यंदा बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २३ मार्चदरम्यान घेण्यात आली. यंदा राज्यातील १५ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. राज्यातील ३ हजार ३२० केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली.

ठाणे जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.०८ टक्के

‘महाराष्ट्र राज्य माध्यमिक-उच्च माध्यमिक परीक्षा मंडळ'तर्फे जाहीर करण्यात आलेल्या बारावी परीक्षच्या निकालानुसार ठाणे जिल्ह्याचा एकूण निकाल ९२.०८ टक्के लागला आहे. बारावी परीक्षेसाठी ठाणे जिल्ह्यातून ९८,००२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९७,६६२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात परीक्षा दिली. यापैकी ८९,९३५ (९४.०७ टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे जिल्ह्यांतर्गत येणाऱ्या कल्याण ग्रामीण (९६.०५ टक्के), अंबरनाथ (९२.४९ टक्के), भिवंडी (८९.१८ ), मुरबाड (९८.०१ टक्के), शहापूर (९२.८० टक्के), ठाणे महापालिका परिक्षेत्र (९२.४१ टक्के), नवी मुंबई महापालिका परिक्षेत्र (९३.० टक्के), भाईंदर महापालिका परिक्षेत्र (९३.४९ टक्के), कल्याण-डोंबिवली (९०.१२ टक्के), उल्हासनगर महापालिका परिक्षेत्र (९०.८० टक्के), भिवंडी महापालिका परिक्षेत्र (९१.६० टक्के) असा निकाल लागला आहे. 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पनवेल महापालिका तर्फे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ट्युलिप इंटर्नशिप पत्राचे वाटप