बिल्डरच्या हत्येचा छडा

नवी मुंबई : सीवूडमध्ये १३ जानेवारी रोजी घडलेल्या बांधकाम व्यावसायिकाच्या हत्येमध्ये मृत मनोजकुमार सिंग याच्या पत्नीचा देखील सहभाग असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एनआरआय पोलिसांनी या हत्या प्रकरणात राजू उर्फ शमसुल अबुहुरैरा खान (२२) याच्या पाठोपाठ मनोजकुमारची पत्नी पुनम सिंग (३४) हिला देखील अटक केली आहे. राजू आणि पुनम या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याने तसेच मनोजकुमारची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशाने त्याची हत्या केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.  

या घटनेतील मृत मनोजकुमार सिंग उलवे भागात राहण्यास होता. तसेच सीवुडस्‌, सेक्टर-४४ भागात त्याचे अमन डेव्हलपर्स नावाचे कार्यालय होते. १२ जानेवारी रोजी मध्यरात्री मनोजकुमार सिंग त्याच्या कार्यालयात एकटाच असताना, अज्ञात मारेकऱ्याने त्याच्यावर जड वस्तुने हल्ला करुन त्याची हत्या केली होती. १३ जानेवारी रोजी सकाळी सदर प्रकार उघडकीस आल्यानंतर एनआरआय पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्याचा मृतदेह ताब्यात घेतला होता. त्यानंतर पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला होता. मृत मनोजकुमार सिंग याने आपल्या सीवुडस्‌ येथील कार्यालयात सुरक्षेच्या सर्वप्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या. त्यामुळे बाहेरचा कुणी व्यक्ती सहज आतमध्ये घुसून त्याची हत्या करणे अशक्य होते.  

त्यामुळे मनोजकुमार सिंग याची हत्या त्याच्या ओळखीतील आणि जवळच्या व्यक्तीने केल्याचा संशय बळावल्याने एनआरआय पोलिसांनी मनोजकुमार सिंग याच्या जवळचे मित्र आणि कार्यालयात काम करणाऱ्या सर्वांचीच चौकशी सुरु केली होती. मनोजकुमार सिंग याच्या कार्यालयात काम करणारा कर्मचारी राजू उर्फ शमसुल खान कायम मनोजकुमार याच्यासोबत राहत होता. त्यामुळे पोलिसांनी संशयावरुन त्याची चौकशी केल्यानंतर त्याच्या बोलण्यात तफावतता असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी राजूची कसून चौकशी केल्यानंतर त्याने मनोजकुमारच्या पत्नीसोबत असलेल्या प्रेमसंबंध असल्याचे आणि दोघांनी कट रचुन सदरची हत्या केल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी मनोजकुमारची पत्नी पुनम सिंग हिला देखील अटक केली आहे.  

मालमत्ता हडप करण्यासाठी हत्येचा कट...
मनोजकुमार सिंग २०२२ मध्ये एका फसवणुकीच्या गुह्यात जेलमध्ये गेला होता. या दरम्यान राजू याचे मनोजकुमारची पत्नी पुनम सिंग हिच्यासोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मनोजकुमार त्याच्यावर दाखल असलेल्या ६ फसवणुकीच्या गुन्ह्यांच्या कोर्ट कचेरीमध्ये व्यस्त राहत होता. त्यामुळे भविष्यात कोर्टाकडून त्याची सर्व मालमत्ता जप्त होण्याची भिती पुनमला होती. त्यामुळे मनोजकुमारला ठार मारुन त्याची सर्व मालमत्ता हडप करण्याचा कट राजू आणि पुनम या दोघांनी रचला होता. त्यानुसार १२ जानेवारी रोजी मनोजकुमार रात्री उशीरापर्यंत आपल्या कार्यालयात एकटाच असल्याची संधी साधुन राजूने त्याच्या डोक्यावर आणि तोंडावर लोखंडी रॉडने हल्ला करुन त्याची हत्या केल्याचे तपासात आढळून आले आहे. 

 फिर्यादीच निघाली आरोपी...
मनोजकुमार सिंग याची हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्याची पत्नी पुनम सिंग हिने पोलिसांना माहिती देताना, रात्री मनोजकुमार याला भेटण्यासाठी कार्यालयात आलेल्या व्यक्तीने त्याची हत्या केल्याचा आरोप केला होता. त्यानुसार तीने पोलिसांकडे फिर्याद देखील दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला होता. मात्र, तपासात पुनम सिंग हिनेच तिचा प्रियकर राजू याच्या मदतीने कट रचून मनोजकुमारची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. या हत्येचे पुरावे मिळू नयेत यासाठी आरोपींनी कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे पुरावे देखील नष्ट केल्याचे तपासात आढळून आले आहे.  

मृत मनोजकुमार सिंग याने पलॅट विकत देण्याच्या बहाण्याने अनेक लोकांची लाखो रुपयांची फसवणूक केली असून त्याच्या विरोधात एनआरआय पोलीस ठाण्यात ६ फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यात मनोजकुमार सिंग याची मालमत्ता कोर्टाकडून जप्त होण्याची भिती त्याची पत्नी पुनम हिला होती. त्यामुळे तिने मनोजकुमार सिंग याच्या कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. न्यायालयाने या दोघांची १८ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
-विवेक पानसरे, पोलीस उपायुवत-परिमंडळ-१, नवी मुंबई. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या कमी करण्याचे उद्दिष्ट