मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
उत्पादनात घट; लसूण फोडणी महाग
दर २६० ते ४०० रुपये प्रतिकिलो गेल्याने गृहीणींचे बजेट विस्कळीत
वाशी : महाराष्ट्र राज्यातील लसूण उत्पादन घटले असून, परराज्यातील लसूण आवक देखील कमी झाली आहे. त्यामुळे वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) घाऊक कांदा-बटाटा बाजारात लसूण प्रतिकिलो दर १५० ते २५० रुपयांवर गेला आहे. तर किरकोळ बाजारात २६० ते ४०० रुपये प्रतिकिलो गेल्याने गृहीणींच्या किचन मधील फोडणी महागली आहे.
महाराष्ट्रातील गावरान ‘लसूण'च्या लागवडीत गेल्या काही वर्षांपासून घट झाल्यामुळे राज्यातील नागरिकांना परराज्यातील लसूण उत्पादक शेतकऱ्यांवर अवलंबून राहावे लागत आहे. आजमितीला राज्यातील सर्वच बाजार आवारात परराज्यातील लसूण आवक देखील कमी झाली आहे. मुंबई आणि उपनगरात लसणाला मोठी मागणी आहे. मागणीच्या तुलनेत लसणाची आवक कमी होत गेल्याने गुजरात आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांनी लसूण एपीएमसी बाजारात विक्रीस पाठविण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारात लसणाचे दर वधारले आहेत. वाशी मधील एपीएमसी बाजारात मागील काही दिवसांपासून आठ ते दहा गाड्या आवक होत असून, १ जानेवारी रोजी एपीएमसी बाजारात १० गाड्या लसूण आवक झाली. त्यामुळे मागणी प्रमाणे आवक कमी होत असल्याने लसूण दरात वाढ होत चालली आहे. एपीएमसी घाऊक बाजारात लसूण दर १५० ते २५० रुपये प्रतिकिलो गेला आहे. तर किरकोळ बाजारात २६० ते ४०० रुपये दराने प्रतिकिलो लसूण विकली जात आहे. त्यामुळे गृहीणींच्या किचन मधील लसूण फोडणी महागली आहे.
दरम्यान, येत्या फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून लसणाचे नवीन उत्पादन वाढणार असून, बाजारात लसूण आवक वाढणार आहे. त्यानंतर लसूण दरात घसरण होईल, अशी माहिती एपीएमसी बाजारातील कांदा-बटाटा व्यापारी मनोहर तोतलानी यांनी दिली.