महापालिका शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेतील सर्व घटकांना पूर्वीची अट कायम

तुर्भे : नवी मुंबई महापालिका द्वारे प्रतिवर्षी विविध घटकातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना शिक्षणासाठी अर्थसहाय्य मिळावे, यासाठी शिष्यवृत्ती दिली जाते. या शिष्यवृत्तीसाठी सर्व घटकांना उत्पन्न आणि गुणांची टक्केवारी या अटींमध्ये काही बदल करण्यात आले होते. मात्र, आता जनतेच्या मागणीमुळे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मान्यतेने सुधारीत अटींमधील बदल रद्द करत सर्व घटकांना पूर्वीच्या अटी कायम ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती नवी मुंबई महापालिका उपायुक्त (समाजविकास विभाग) किसनराव पलांडे यांनी दिली.

महापालिका समाजविकास विभागाच्या माध्यमातून प्रतिवर्षी विविध घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली जाते. यामध्ये विधवा / घटस्फोटित महिलांच्या मुलांना, आर्थिक आणि दुर्बल घटकातील शाळेत जाणाऱ्या इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन विद्यार्थांना, महापालिका क्षेत्रातील स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातील विद्यार्थांना, महापालिका क्षेत्रातील महापालिका आस्थापनेवरील सफाई कामगार आणि कंत्राटी पध्दतीवर कामावर असलेल्या कामगारांच्या मुलांना, नवी मुंबई क्षेत्रातील दगडखाण/बांधकाम/रेती/नाका कामगारांच्या मुले-मुलींना, मागासवर्गीय विद्यार्थांना शिष्यवृत्तीचे वितरण केले जाते. या योजनांचा लाभ घेण्यासाठी यावर्षी अटींमध्ये काही बदल करण्यात आले होते. यामध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल, विधवा/घटस्फोटित, प्रकल्पग्रस्त, सफाई कामगार, कंत्राटी कामगार, दगडखाण आणि नाका कामगार या घटकातील मुले-मुलींकरीता ८ लाख रुपये रकमेच्या आत उत्पन्नाचा दाखला देण्याची अट घालण्यात आली होती. पूर्वी सदर अट केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या मुलांना होती. तसेच मागील वर्षी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील आणि मागासवर्गीय विद्यार्थी यांना ६५ टक्के गुणांची अट होती. सदर अट यंदा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना ८० टक्के इतकी करण्यात आली होती. तर नाका कामगार, सफाई कामगार यांना उत्पन्न दाखला देण्याची अट नव्हती. शिष्यवृत्तीसाठी यंदा सर्व घटकांना ८ लाख रुपये उत्पन्न दाखला देण्याची अट घालण्यात आली होती. या अटींमधील बदलामुळे हजारो गरीब विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीला मुकावे लागणार होते. त्यामुळे सर्व घटकातील विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये नाराजी पसरली होती. पालकांनी जुनी अट ठेवण्यासाठी लोकप्रतिनिधींना विनंती केली होती. त्यानुसार विविध पक्षांचे पदाधिकारी आणि सामजिक कार्यकर्ते यांनी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांना निवेदनाद्वारे तसेच मेल द्वारे वरील सुधारित अटी रद्द करत मागील वर्षीच्या जुन्या अटी ठेवण्याची मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेऊन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी शिष्यवृत्तीसाठी मागील वर्षीच्या अटी कायम ठेवत पालक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांना दिलासा दिला आहे.

शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मिळण्याकरिता ऑनलाईन अर्ज भरण्यास ८ फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२४ आहे, असे महापालिका उपायुक्त (समाजविकास विभाग) किसनराव पलांडे यांनी सांगितले.

शिष्यवृत्ती द्वारे मिळणारी रवकम
इयत्ता पहिली ते चौथी : ४ हजार रुपये
इयत्ता पाचवी ते सातवी : ६ हजार रुपये
इयत्ता आठवी ते दहावी : ८ हजार
इयत्ता अकरावी ते बारावी : ९,६०० रुपये
पदवी : १२ हजार रुपये 

 

Read Previous

पाचवी व आठवीच्या स्कॉलरशीप परीक्षेत नमुंमपा शाळेतील 49 विद्यार्थ्यांचे कौतुकास्पद यश

Read Next

पर्यावरण सेवा योजनेंतर्गत शांती निकेतन पब्लिक स्कूलमध्ये महापालिकेच्यावतीने व्याख्यानाचे आयोजन