ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
बेलापूर, सीबीडी, वाशी येथे महाआरोग्य तपासणी शिबीर संपन्न
नवी मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून बेलापूर, सेक्टर-१५ मधील दुर्गामाता नगर, सेवटर-८ सीबीडी आणि वाशी, सेक्टर-६ मिनी मार्केट पार्किंग येथील युनिट क्र.२ येथे मोफत महाआरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोफत महाआरोग्य शिबिराला हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत शिबिराचा लाभ घेतला.
‘भाजपा ट्रान्सपोर्ट सेल'चे महाराष्ट्र राज्य उपचिटणीस अश्विन अगमकर, सलील गवळी, ‘भाजपा अनुसूचित जाती मोर्चा'चे माजी जिल्हाध्यक्ष विकास सोरटे, समाजसेवक प्रताप भोसकर यांच्या वतीने सदर महाआरोग्य शिबीर यशस्वी करण्यात आले. लॉयन्स क्लब ऑफ नवी मुंबई चॅम्पियन्स, मयुरेश हॉस्पिटल-तुर्भे, साई दृष्टी आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सदर मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महाआरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब, डायबेटीस, बीएमआय, ईसीजी, डोळ्यांची तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला तसेच मोफत औषधे, डाबर च्यवनप्राश आणि मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले.
दरम्यान, मी नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर गेल्या २८ वर्षापासून अशा प्रकारच्या मोफत महाआरोग्य शिबिराचे आयोजन करीत आहे. अशा कार्यक्रमांच्या आयोजनातूनन मला जनतेची आणि वयोवृध्द नागरिकांची सेवा करण्याची संधी मिळत असल्याने त्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी सांगितले.