‘महानगर गॅस'कडून घणसोली मधील रस्त्यांची चाळण

नवी मुंबई : घणसोली नोड हस्तांतरानंतर नवी मुंबई महापालिकेने कोट्यवधींचा निधी घणसोली मधील रस्त्यांसाठी खर्च केलेला आहे. असे असले तरीही येथील रस्त्यांची दुरवस्था झालेली पाहावयास मिळत आहे. विविध सुविधांच्या नावाखाली खाजगी कंपन्या दर महिन्याला रस्त्यांचे खोदकाम करुन एक प्रकारे रस्त्यांची चाळणच करीत आहेत. एकंदरीतच खोदकाम परवानगीच्या नावाखाली महापालिका प्रशासन या खाजगी कंपन्यांना आपला वरदहस्त देत असल्याचे निदर्शनास येत आहे.

महानगर गॅस या कंपनीने गॅसची पाईपलाईन टाकण्याकरिता रस्ता खोदण्याची परवानगी नवी मुंबई महापालिकेकडे मागितली असता महापालिकेने १९ डिसेंबर २०२२ ते १८ जानेवारी २०२३ सदर कंपनीला रस्त्याचे खोदकाम करण्याची परवानगी सशर्त दिलेली होती. या दरम्यान ‘महानगर गॅस'ने घणसोली मधील ७१५ मीटर लांब रस्त्याचे खोदकाम करुन गॅस पाईपलाईन टाकली. त्यानंतर सदर कंपनीने पुन्हा एकदा महापालिकेकडे रस्ता खोदकाम करण्यासाठी वाढीव परवानगी असता महापालिकेने ५ जानेवारी ते ४ फेब्रुवारी २०२४ पर्यंत काम करण्याची परवानगी दिली.

वास्तविक पाहता २०२२ साली देण्यात आलेल्या परवानगी नंतर खोदकाम केल्यावर महापालिकेने रस्त्यांची दुरुस्ती केलेली होती, असे असतानाही पुन्हा मुदतवाढ देण्याचे कोणतेही कारण नव्हते. तरीही महापालिका परिमंडळ-२ च्या उपायुक्तांच्या माध्यमातून २०२४ साली रस्त्यांच्या खोदकामाची ‘महानगर गॅस'ला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा सुस्थितीत असलेल्या रस्त्यांची पुरती चाळण झाल्याचा आरोप ‘मनसे'च्या रस्ते आस्थापना विभागाचे नवी मुंबई शहर संघटक संदीप गलुगडे आणि घणसोली विभाग अध्यक्ष नितीन नाईक यांनी केला आहे.

सदर रस्त्याचे खोदकाम करत असताना महापालिकेने परवानगी पत्रामध्ये घालून दिलेल्या अटी-शर्ती यांचीपायमल्ली सुध्दा संबंधित कंपनीने केली असून त्याकडे संबंधित महापालिका उपअभियंत्यांनी जाणिवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास आले आहे. महापालिका अधिकाऱ्यांच्या या गलथान कारभारामुळे महापालिकेचे लाखो रुपयांचे कर स्वरुपात नुकसान होत असल्याचे संदीप गलगुडे आणि नितीन नाईक यांनी केला आहे.

दरम्यान, महानगर गॅस कंपनीला मुदतवाढ देऊन सुध्दा अजुनही रस्त्यांचे खोदकाम सुरुच असून यापुढे संबंधित कंपनीला मुदतवाढ देण्यात येणार नाही, असे महापालिकेच्या परवानगी पत्रामध्ये नमूद असलेला मुद्दा लक्षात घेता, यापुढे महानगर कंपनीला घणसोली मध्ये कुठेही खोदकामाची परवानगी देण्यात येऊ नये, अशी मागणी महापालिका आयुक्तांकडे करणार असल्याचेही संदीप गलगुडे यांनी सूचित केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 प्रतिष्ठेच्या पुरस्काराने टिळक ज्युनियर कॉलेज - नेरूळ सन्मानित