महावाचन उत्सवात 5 हजाराहून अधिक विद्यार्थी, शिक्षक, पालकांनी अधोरेखित केले पुस्तकांचे महत्व
लसूण दरात घसरण; फोडणी झाली स्वस्त
वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) कांदा-बटाटा घाऊक बाजारात नवीन लसूण आवक वाढली असल्याने लसूण दर उतरले आहेत. घाऊक बाजारात लसूण दर १५० ते ३०० रुपयांवरुन आता ५० ते १४० रुपयांवर आले आहेत. त्यामुळे जेवणातील लसूण फोडणी स्वस्त झाल्याने सर्वसामान्य गृहिणींना मोठा दिलासा मिळाला आहे
एपीएमसी बाजारात जानेवारी-फेब्रुवारीमध्ये लसूण आवक कमी झाल्याने लसूण दरात प्रचंड वाढ झाली होती. कमी आवकमुळे घाऊक बाजारात लसूण दर कमाल ३५० ते किरकोळ बाजारात ४८० रुपयांवर गेला होता. मात्र, आता नवीन लसूण आवक होत आहे. त्यामुळे नवीन लसूण बाजारात दाखल होताच दर आवाक्यात येत असतात. पाच वर्षांपूर्वी लसूण दर गगनाला भिडले होते. त्यावेळी घाऊक बाजारात लसूण दराने प्रतिकिलो २०० ते २५० रुपयांची मजल मारली होती. एपीएमसी बाजारात मध्यप्रदेश मधून सर्वाधिक लसूण आवक होते. ३० मार्च रोजी एपीएमसी बाजारात मध्यप्रदेश राज्यातून १४ गाड्यांमधून ३१६६ गोणी लसूण दाखल झाली आहे. यामध्ये एक देशी लसूण आणि दुसरा उटी लसूण या दोन प्रकारच्या ‘लसूण'चा समावेश आहे. यामध्ये उटी लसूण अधिक दराने विक्री होत असून, प्रतिकिलो ८० ते १४० रुपये दर तर देशी लसूण ५० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात सध्या नवीन लसूण दाखल होत असून आवक चांगली होत असली तरी ती ओली लसूण आहे.त्यामुळे लसूण दर घसरत चालले आहेत.
दरम्यान, एपीएमसी कांदा-बटाटा बाजारात येत्या दोन आठवड्यानंतर सुकी लसूण दाखल होण्यास सुरुवात झाल्यानंतर लसूण दर आणखी वाढण्याची शक्यता एपीएमसी कांदा-बटाटा बाजारातील व्यापारी मनोहर तोतलानी यांनी वर्तवली आहे.