‘वलस्टर'च्या बायोमेट्रिक सर्व्हेसाठी नागरिक आग्रही

कल्याण : डोंबिवली दत्तनगर आयरे परिसरात ‘वलस्टर योजना' राबविली जाणार आहे. या योजनेकरिता बायोमेट्रीक सर्वेक्षण केले जात आहे. काही भूमाफियांमुळे सदर सर्वेक्षण बंद पाडले जात आहे. त्यामुळे गरीबांना ‘वलस्टर योजना'तून हक्काचे घर मिळणार की नाही? असा संतप्त सवाल उपस्थित करीत नागरिकांनी स्वतःच्या तोंडाला काळे फासून कल्याण-डोंबिवली महापालिका मुख्यालयावर निषेध मोर्चा काढत आंदोलन केले.

यावेळी आंदोलनकर्त्या नागरिकांनी महापालिका प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. भारतीय कम्युनिस्ट पक्ष रेड स्टार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये राज्याचे समन्वयक सचिव अरुण वेळासकर आणि पदाधिकारी सुनिल नायक नागरिकांसह तोंडाला काळे फासत सहभागी झाले होते.

धोकादायक इमारतीतील नागरिक जीव मुठित धरुन वास्तव्य करीत आहे. त्यांच्या पुनर्वसनाची मागणी गेल्या अनेक वर्षापासून केली जात आहे. महापालिकेने ४१ ठिकाणी क्लस्टर योजना राबविण्याचे ठरविले आहे. त्यापैकी सगळ्यात प्रथम कल्याण  मधील कोळसेवाडी आणि डोंबिवली मधील दत्तनगर आयरे परिसरात ‘वलस्टर योजना' प्रथम राबविली जाणार आहे. त्याकरिता बायोमेट्रीक सर्वेक्षण करण्यासाठी १० कोटी रुपये खर्चाची निविदा मंजूर करुन सदर काम एजन्सीला देण्यात आले आहे.

या एजन्सीकडून काम सुरु करण्यात आले. डोंबिवली मधील दत्तनगर आयरे परिसरात ‘बायोमेट्रीक सर्वेक्षण'चे काम भूमाफियांकडून बंद पाडले जाते. सर्वेक्षण सुरु करण्याची मागणी अनेकवेळा करुन देखील बंद पडलेले सर्वेक्षण सुरु झालेले नाही.

दरम्यान, सर्वेक्षण पोलीस संरक्षणात केले जाईल, असे लेखी पत्र महापालिकेने नायक आणि वेळासकर यांना दिले होते. मात्र, महापालिका केवळ पत्रव्यवहार करुन नागरिकांची बोळवण करीत आहे. शासन आपल्या दारी डोंबिवलीत कार्यक्रम पार पडला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्याच्या माध्यमातून सदर प्रश्न सोडवू, असे सांगितले होते. पण, प्रत्यक्षात नागरिकांना सरकारच्या दारी खेटे मारावे लागतात. यावरुन शासन आपल्या दारी कार्यक्रम नागरिकांनीची शुध्द फसवणूक असल्याचा आरोप नायक यांनी केला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मतदार यादीत पत्यावर न राहणाऱ्या मतदारांची नोंद