म्हाडा निर्णयाच्या धर्तीवर सिडकोनेही घरांच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घ्यावा
करंजाडेवासिय पाणी टंचाईने त्रस्त
नवीन पनवेल: करंजाडे वसाहत पाणीटंचाईने त्रस्त झाली आहे. या विरोधात सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांच्या अध्यक्षतेखाली सभा घेण्यात आली. या सभेत सिडको विरोधात करंजाडेवासियांनी संताप व्यक्त केला. पाणी टंचाईबाबत ‘सिडको'ने तात्काळ कार्यवाही केली नाही तर ‘सिडको'विरोधात करंजाडेवासीय लवकरच जाब मोर्चा काढणार आहेत. सदर सभेला अनेक करंजाडे वसाहती मधील महिला, नागरिक उपस्थित होते.
गेल्या काही वर्षांपासून करंजाडे वसाहतीला पाणीटंचाईचे ग्रहण लागलेले आहे. सदर ग्रहण अद्याप देखील सुटलेले नाही. त्याचा त्रास येथे राहणाऱ्या नागरिकांना होत आहे. काही नागरिकांनी पाण्याअभावी येथील पलॅट विकून दुसऱ्या ठिकाणी राहणे पसंत केले आहे. यावरुन पाणीटंचाईची भीषणता लक्षात येते. पाणी नसल्याने कोणतीही कामे होत नाहीत. पाण्याबाबत अधिकाऱ्याला नागरिकांनी फोन केला असता त्याने शिवीगाळ केला असल्याचा आरोप नागरिकांनी केला. यावेळी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सभेत सांगण्यात आले. सर्वांनी राजकीय चपला बाजुला काढून एक नागरिक म्हणून सदर जाब मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते विनोद साबळे यांनी यावेळी केले. तसेच पाण्याअभावी होणाऱ्या त्रासाचा जाब सिडको अधिकाऱ्यांना विचारण्यासाठी हजाराेंच्या संख्येने नागरिकांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
यावेळी महिला, नागरिक यांनी पाणीटंचाईचा सामना कसा करतो? याबद्दल सांगितले. तसेच विविध प्रश्न उपस्थित केले. पाण्याच्या लाईनला लागलेली गळती एमजीपीने दुरुस्त करावी, अशी सूचना यावेळी मांडण्यात आली. करंजाडे वसाहतीचे पाणी विमानतळाला फिरवले असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळेच वसाहतीत पाणी टंचाई निर्माण झाल्याचे सांगण्यात आले. ‘सिडको'चे अधिकारी केवळ पगार घेण्यापुरता आहेत का? आम्हाला हक्काचे पाणी मिळणार आहे का नाही? असा सवाल यावेळी विचारण्यात आला. १० जून पर्यंत पाणी पुरवठा सुरळीत झाला नाही तर जाब मोर्चा काढण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.