एनएमएमटीच्या तुर्भे डेपोत इलेक्ट्रीक बसला लागलेल्या आगीत दोन बस खाक

नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेच्या (एनएमएमटी) तुर्भे आगारात उभ्या असलेल्या दोन बस जळुन खाक झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. सुदैवाने या दुर्घटनेत कुठल्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही.  इलेक्ट्रीक बसमधील बॅटरीचा स्फोट होऊन ही आग लागल्याचे बोलले जात आहे. यापूर्वी देखील एनएमएमटीच्या इलेक्ट्रीक बसेस बॅटऱयांचा स्फोट  होऊन आगीच्या भक्षस्थानी पडल्याच्या घटना घडल्या आहेत.  

एनएमएमटीच्या तुर्भे आगारात उभ्या असलेल्या इलेक्ट्रीक बसला रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही वेळातच संपुर्ण बसला ही आग लागली. या आगीची झळ बाजुला उभ्या असलेल्या एनएमएमटीच्या दुसऱया बसला देखील लागली. त्यामुळे या आगीत सदर बसने सुद्धा पेट घेतला. या घटनेची माहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनस्थळी धाव घेऊन दोन्ही बसला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.  

रात्री 10 नंतर अग्निशमन दल्याच्या जवानांनी या बसला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दोन्ही बस जळुन खाक झाल्या. दरम्यान, ज्या इलेक्ट्रीक बसमध्ये आग लागली, त्या बसच्या बॅटरीचा ओव्हर हिटींगमुळे स्फोट झाल्यामुळे सदर  बसला आग लागल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, ओव्हर हिटींगमुळे इलेक्ट्रीक बसच्या बॅटरींचा स्फोट होण्याचे प्रकार वाढत असून गत नोव्हेंबर महिन्यामध्ये देखील एक इलेक्ट्रीक बस तुर्भे डेपोमध्ये जळून खाक झाली होती. तर एका इलेक्ट्रीक बसने रस्त्यावरच पेट घेतल्याचा प्रकार घडला होता.  

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

 ‘रबाले एमआयडीसी' पोलिसांचे कोंबींग ऑपरेशन