नवी मुंबईतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत -खा.विचारे

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटली तरी शिल्लकच असल्याचे दिसून येत आहेत. त्यामुळे आगामी पावसाळ्यात नवी मुंबईत पाणी तुंबणार नाही याकडे महापालिका प्रशासनाने लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तत्काळ पूर्ण करावीत, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे) नेते खा. राजन विचारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे केली.

माजी नगरसेवक आणि ‘शिवसेना' पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली खा. विचारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख  विठ्ठल  मोरे, द्वारकानाथ भोईर, महिला जिल्हा संघटक रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख एम. के. मढवी, सुमित्र कडू, संदीप पाटील, संतोष घोसाळकर, प्रकाश पाटील, मनोज हळदणकर, सुर्यकांत मढवी, संकेत डोके, शहर प्रमुख प्रविण म्हात्रे, काशिनाथ पवार, महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, माजी नगरसेवक रतन मांडवे, विजयानंद माने, सतीश रामाने, उपशहर प्रमुख समीर बागवान, महेश कोटीवाले, विनोद मुके, विभाग प्रमुख विशाल विचारे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे-बेलापूर मार्गावरील एमआयडीसी परिसरातील नेेरुळ, तुर्भे, खैरणे आणि दिघा या ठिकाणी नाल्यांची झालेली दुरावस्था अत्यंत दयनीय आहे. फार वर्षांपूर्वी सदर नाले बनविण्यात आले होते, ते आता जीर्ण झाले आहेत. सदरची जागा ‘एमआयडीसी'ची असल्याने महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने नाल्यांची दुरुस्ती झाली नाही.

नाल्यांची परिस्थिती गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा खासदार विचारे यांनी यावेळी केला. पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपायोजना करुन नाला प्रवाहित करुन घ्यावा. वाशी, सेक्टर-८ आणि १० येथील होल्डिंग पॉन्ड धोकादायक झालेला पंप हाऊस तोडून नवीन बांधण्याची विनंती करुनही त्याकडे प्रशासनाने डोळेझाक केली आहे. प्रशासनाने सदर जागेसंदर्भात प्रकरण न्याय प्रविष्ट असल्यास पाणी उपसा पंप लावण्याची मागणी खा. विचारे यांनी यावेळी केली.

नवी मुंबईतील सर्व अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करा...

नवी मुंबई शहरातील ज्यांच्या होर्डिंगच्या परवाना संपल्या आहेत किंवा विनापरवाना जे होर्डिंग उभे करण्यात आले आहेत, ते होर्डिंग काढून टाकावेत. त्याचबरोबर रितसर परवाना घेतलेल्या होर्डिंगच्या साईज प्रमाणे नसलेल्या होर्डिंगवर देखिल कारवाई करुन त्यांना दंड आकारावा. तसेच वाढीव स्ट्रक्चर तत्काळ काढून टाकावेत, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी केली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘कोकण पदवीधर मतदारसंघ'मध्ये निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल