ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
आकिफ रेशमवाला याची ‘एमबीबीएस'मध्ये सुवर्ण कामगिरी
ठाणे : ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय मधील ‘एमबीबीएस'चा विद्यार्थी आकिफ रेशमवाला याने राज्यस्तरावर प्रथम येत ‘महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ'मधून सुवर्ण पदक मिळविले आहे. आकिफला जनरल मेडिसीन या विषयात सुवर्ण पदक मिळाले आहे. तो महाविद्यालयातही प्रथम आला असून प्रसुती-स्त्रीरोग आणि बाल रोग या विषयात त्याला विशेष प्राविण्य मिळाले आहे.
आकिफ रेशमवाला याने महाविद्यालय मध्ये पहिल्या वर्षापासून विशेष प्राविण्य मिळवले आहे. पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी त्याला महाविद्यालयीन स्तरावरील सुवर्ण पदक मिळाले होते. ‘एमबीबीएस'च्या पहिल्या वर्षी तो राज्यातून पाचवा आला होता. चारही वर्षात त्याने अव्वल शैक्षणिक कामगिरी केली आहे. ‘एमबीबीएस'च्या चौथ्या वर्षी त्याला ७५.७८ टक्के गुण मिळाले आहेत.
आकिफ मुळचा मुंबईचा असून आता त्याने आता नीट-पीजी या प्रवेश परीक्षेच्या तयारीवर लक्ष केंद्रित केले आहे. जनरल मेडिसीन या विषयातील सुवर्ण पदक मिळाल्याने खूप आनंद झाला, परिश्रमाचे चीज झाले, अशी प्रतिक्रिया आकिफने व्यक्त केली आहे. राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालय आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथे मला खूप शिकायला मिळाले. शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनाचा अभ्यासात पदोपदी उपयोग झाला. त्यामुळेच मी जनरल मेडिसीन या विषयात सर्वोत्कृष्ट कामगिरी करु शकलो आणि महाविद्यालयाचा गौरव वाढवू शकलो, असेही आकिफने सांगितले.
नियमित केलेला अभ्यास, रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टरांसोबत काम करताना मिळणारा अनुभव याचा फायदा झाल्याचेही आकिफ याने सांगितले.
दरम्यान, आकिफ अतिशय हुशार आणि मेहनती विद्यार्थी आहे. त्याने पहिल्या वर्षापासून शैक्षणिक कामगिरीत सातत्य ठेवले आहे. त्याशिवाय त्याने ‘विद्यार्थी परिषद'च्या २०२१-२२ या वर्षात शैक्षणिक सचिव आणि संशोधन प्रमुख म्हणूनही काम केले आहे. वेगवेगळ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेतही त्याने यशस्वी सहभाग घेतला आहे. त्याचा या यशामुळे आम्ही सगळे समाधानी आहोत, असे राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. राकेश बारोट यांनी सांगितले.