ऐन वायू प्रदूषणावेळी हवा गुणवत्ता केंद्र बंद?

वाशी : वाशी सेक्टर-२६ परिसरात रात्री मोठ्या प्रमाणात वायू  प्रदूषण होत असते. मात्र, ऐन वायू प्रदूषणावेळी  वाशी सेक्टर-२६ मधील हवा गुणवत्ता केंद्र बंद असते. त्यामुळे हवा गुणवत्ता केंद्र जाणीवपूर्वक बंद ठेवून प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ पाठीशी घालत आहे का?, असा प्रश्न  वाशी सेक्टर-२६ मधील रहिवाशांनी उपस्थित केला आहे.

नवी मुंबई परिसरात आशिया खंडातील सर्वात मोठा टीटीसी  औद्योगिक पट्टा मोडतो. या औद्योगिक पट्यातील रासायनिक कंपन्यांमधून प्रक्रिया न करताच सांडपाणी नाल्यात सोडणे, रात्री रासायनिक वायूमिश्रित वायू हवेत सोडणे असे प्रकार सर्रासपणे केले जातात. त्यामुळे कोपरखैरणे, कोपरी गाव, घणसोली, तुर्भे, ऐरोली भागातील  नागरिकांना अनेकदा उलटी होणे,पोटात मळमळणे, डोळे चुरचुरणे, श्वासनास त्रास होणे, अंगाला खाज सुटणे आणि इतर त्वचा विकार होणे, असे प्रकार घडलेले आहेत. या घटना घडू नयेत तसेच प्रदूषणाचे नेमके कारण शोधून त्यात नेमके कोणते घटक असतात याचा शोध घेऊन वायू प्रदूषण होण्यावर प्रतिबंध घालण्यासाठी नवी मुंबई शहरात नवी मुंबई महापालिका आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या द्वारे सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. कोपरी गाव नाल्याजवळ देखील सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. खैरणे, पावणे एमआयडीसी मधील रासायनिक कारखान्यांमधून रात्री-अपरात्री  प्रदूषित वायू सोडले जातात. या प्रदूषित वायूचा नाहक त्रास वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव तसेच खैरणे परिसरातील नागरिकांना होतो. मात्र, जेव्हा या परिसरात सर्वाधिक वायु प्रदूषण होते नेमके त्याच वेळी कोपरी गाव येथील हवा गुणवत्ता केंद्र बंद असते.त्यामुळे येथील प्रदूषित हवेची  गुणवत्ता सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहचत नाही. त्यामुळे कोपरी गाव येथील सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्र जाणीव पूर्वक बंद ठेवून प्रदूषण करणाऱ्या कारखानदारांना महाराष्ट्र नियंत्रण प्रदूषण मंडळ पाठीशी घालत आहे का?, असा सवाल वाशी सेक्टर-२६, कोपरी गाव तसेच खैरणे परिसरातील नागरिक उपस्थित करीत आहेत.

कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६ परिसर वायू प्रदूषणामुळे रात्री अक्षरक्षः गॅस चेंबर मध्ये परावर्तीत होतो. कोणीच बाहेर मोकळ्या हवेत श्वास घेऊ शकत नाही. प्रशासन बेजबाबदार पणे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे प्रशासनास येथील नागरिकांचास जीव हवा आहे का?, असा प्रश्न पडत आहे. -  संकेत डोके, अध्यक्ष - नवी मुंबई अधिष्ठान.

कोपरी गाव, वाशी सेक्टर-२६, २८ आणि २९ नोड्‌स वायू प्रदूषणामुळे गॅस चेंबर बनले आहेत. रात्री जेव्हा वायू प्रदूषण वाढते तेव्हा नेमके हवा गुणवत्ता आलेख अनुपलब्ध असतात. त्यामुळे अधिकाऱ्यांनी येथील लोकांना  मरण्यासाठी सोडले आहे का?. - प्रा. विनिलकुमार सिंग, रहिवासी - सेक्टर-२६, वाशी.

सनियंत्रित हवा गुणवत्ता केंद्राच्या नोंदी रोजच्या रोज प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे उपलब्ध होत असतानाही जर कोपरी गाव येथील हवा गुणवत्ता केंद्र बंद दिसत असेल तर त्याच्या स्क्रीन मध्ये काही तांत्रिक बिघाड असतील तर त्याची तपासणी केली जाईल. - जयंत कदम, उप प्रादेशिक अधिकारी - महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नवी मुंबई. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 संकल्पित रेल्वे स्थानकाला ‘श्रीस्थानक' नाव देण्याची मागणी