‘कस्टम'च्या ताब्यातील १६ कोटींच्या मालाची चोरी

नवी मुंबई : कस्टम ड्युुटी चुकवून जेएनपीटी बंदरात आयात करण्यात आलेली आणि कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी ताब्यात घेऊन पनवेलच्या शिरढोण येथील वेअरहाऊसमध्ये ठेवलेली तब्बल १६.०६ कोटी रुपये किंमतीची सुपारी आणि मिरी या मालाची वेअरहाऊच्या चालक मालकांनीच चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात पनवेल शहर पोलिसांनी कस्टम विभागाने दिलेल्या तक्रारीवरुन मालाच्या चोरी प्रकरणात सहभागी असलेल्यांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.  

सन २०२२ मध्ये अल्फा इंडस्ट्रीज, हायलॅन्ड इंटरनॅशनल आणि पयुचर फस्ट इंटरनॅशनल या तीन कंपन्यांनी परदेशातून कस्टम ड्युटी चुकवून कोट्यवधी रुपये किंमतीची सुपारी आणि मिरी या मालाची आयात केली होती. डिसेंबर २०२२ मध्ये जेएनपीटी बंदरात सदर माल आल्यानंतर कस्टम ड्युटी भरली न गेल्यामुळे कस्टम विभागाने या तीन्ही कंपन्यांचा माल जप्त करुन पनवेलच्या शिरढोण येथील आशेरा वेअरहाऊस ॲन्ड पार्क मधील वेगवेगळ्या गाळ्यामध्ये ठेवला होता. यादरम्यान सदर मालाची कस्टम डयुटी न भरता त्याची चोरी करण्यात येत असल्याची माहिती ‘डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स'च्या (डीआरआय) अधिकाऱ्यांना मिळाली होती.

 त्यामुळे डिसेंबर २०२२ मध्ये ‘कस्टम'च्या अधिकाऱ्यांनी सदर गाळ्यामध्ये जाऊन मालाची तपासणी केली असता, गाळ्यामध्ये ठेवण्यात आलेला अल्फा इंडस्ट्रीज या कंपनीची संपूर्ण ६.३३ कोटी रुपये किंमतीची १२८८ मेट्रीक टन मिरी चोरुन नेण्यात आल्याचे आणि त्याजागी दुसरी वस्तू ठेवण्यात आल्याचे आढळून आले. त्यामुळे कस्टम विभागाने सदरचा माल सील करुन त्याचठिकाणी ऑलसन शिपींग ॲन्ड लॉजिस्टीक्स प्रा.लि.च्या गाळ्यामध्ये ठेवला होता.

 दरम्यान, याच गाळ्यामध्ये ठेवण्यात आलेला इतर कंपन्याचा माल देखील चोरुन नेण्यात येत असल्याची माहिती ऑगस्ट २०२३ मध्ये ‘डीआरआय'च्या पथकाला मिळाली होती. त्यामुळे कस्टम विभाग, डीआरआय आणि सीआययु, ऑडीट सेक्शन या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी शिरढोण येथील वेअरहाऊसला भेट देऊन संपूर्ण मालाची तपासणी केली. यावेळी शॉप नंबर ६च्या भिंतीला भगदाड पाडून त्यातून मालाची चोरी केल्याचे आणि त्याजागी मिरी आणि सुपारी सारखी दिसणारी वस्तू ठेवून सदर भिंत पुन्हा बंद करण्यात आल्याचे आढळून आले.

यानंतर कस्टम विभागाने सदर मालाच्या चोरीबाबत अधिक तपास केला असता, ऑलसन शिपींग ॲन्ड लॉजिस्टीक्स प्रा.लि. कंपनीचा मालक संजय साबळे, आँल्वीन सलाढाना, वेअरहाऊसचा मॅनेजनर विनयकुमार मिश्रा आणि कमलेश वैद तसेच त्यांच्या इतर साथीदारांनी संगनमत करुन ‘कस्टम'च्या ताब्यात असलेल्या तब्बल १६.०६ कोटी रुपये किंमतीची सुपारी आणि मिरी चोरुन नेल्याचे आढळून आले. त्यानंतर कस्टम विभागाने पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

 

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

नोकरीसाठी गेलेल्या २ तरुणांची  कुवेतच्या तुरुंगातून सुटका