महापालिका मुख्यालयाची सुरक्षा ‘एमएसएससी'च्या हाती
तुर्भे : नवी मुंबई महापालिका मुख्यालयामध्ये सुरक्षा रक्षक मंडळाच्या सुरक्षा रक्षकांना काढून त्यांच्या जागी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एम.एस.एस. सी.) या शासकीय संस्थेचे सुरक्षा रक्षक नेमण्यात आले आहेत. या सुरक्षा रक्षकांचा गणवेश कमांडोच्या गणवेशा सारखा दिसत असल्याने जणूकाही सैन्य दलाच्या जवानांनी नवी मुंबई महापालिका मुख्यालयाचा ताबा घेतल्याचे सर्वसामान्यांना वाटत आहे.
महापालिका मुख्यालयामध्ये ‘एमएसएससी'चे सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव यापूर्वी महासभेत मंजूर झाला होता. त्या प्रस्तावाला आता अंतिम स्वरुप देण्यात आले आहे. यामध्ये बंदूकधारी सुरक्षा रक्षकांचाही समावेश असणार आहे, अशी माहिती महापालिका उपायुक्त शरद पवार यांनी दिली.
नवी मुंबई महापालिकेच्या स्थापनेपासून खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी मार्फत सुरक्षा रक्षक पुरवण्यात आले होते. महापालिका मुख्यालयसह रुग्णालय आणि अन्य वास्तूकरिता सुमारे ८० सुरक्षा रक्षकांपासून सुरुवात झाली होती. २००२ साली या सुरक्षा रक्षकांना सुरक्षा रक्षक मंडळामध्ये भरती होण्यासाठी सांगण्यात आले. तसेच त्यांनाच पुन्हा महापालिकेत सुरक्षा रक्षक मंडळ मार्फत नियुक्त करण्यात आले. तिथपासून आजमितीस मंडळाचे एक हजारपेक्षा अधिक सुरक्षा रक्षक सेवा देत आहेत. २६ जुलै २०११ रोजी समुद्रमार्गे मुंबई शहरात दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक संवेदनशील वास्तूंची सुरक्षा अधिक सक्षम करावी, असे निर्देश शासनानेदिले होते. त्यानंतर काही वर्षातच नवी मुंबई महापालिकेचे सीबीडी येथील मुख्यालय पामबीच मार्ग येथे स्थलांतरित झाले. नवीन महापालिका मुख्यालय जवळच खाडी असल्याने तत्कालीन महापालिका सदस्यांनी या वास्तूच्या सुरक्षेविषयी चिंता व्यक्त करत महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ (एम.एस.एस. सी.) या शासकीय संस्थेचे सुरक्षा रक्षक नेमण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यावेळी सर्व सुरक्षा रक्षकांनी एकत्र येत महापौरांना विनंती केल्याने तो बासनात गुंडाळण्यात आला होता. मात्र, माजी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या कार्यकाळात विविध मोर्चे आणि आंदोलने महापालिकेत ज्या पद्धतीने झाली, त्याचे गांभीर्य पाहता राजेश नार्वेकर यांनी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाच्या सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार आता महापालिका मुख्यालय, महापौर निवासस्थान आणि आयुक्त निवासस्थान या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे प्रशिक्षित सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये मुख्य सुरक्षा अधिकारी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक असणार आहेत. तसेच या अंतर्गत ४ सुरक्षा पर्यवेक्षक, ३१ हत्यारी सुरक्षा रक्षक, ३५ सुरक्षा रक्षक, ३ महिला सुरक्षा रक्षक असे एकूण ७४ सुरक्षा रक्षक आणि अधिकारी असणार आहेत. या सुरक्षा रक्षकांवर वर्षाला ३ कोटी ५४ लाख रुपये खर्च होणार आहे. समाज विघातक घटकांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस ठाणे मध्ये घेऊन जाण्याचे अधिकार या महामंडळातील सुरक्षा रक्षकांना प्राप्त आहेत.
दरम्यान, नवी मुंबई महापालिका मुख्यालयातील सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यरत ४८ सुरक्षा रक्षकांना महापालिकेच्या अन्य मालमत्तांच्या ठिकाणी नेमण्यात आले आहे.