खारघर, पनवेल मधील २७ अनधिकृत पान टपऱ्यांवर महापालिकेची तोडक कारवाई

६ झोपड्या जमीनदोस्त; ३ हातगाड्या जप्त

पनवेल : खारघर आणि पनवेल मध्ये पदपथ, रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या अनधिकृत पान टपऱ्या, हातगाड्या, अनधिकृत झोपड्या, वडापाव दुकानांवर पनवेल महापालिका खारघर प्रभाग ‘अ' कार्यालय आणि पनवेल प्रभाग ‘ड' कार्यालय तर्फे २७ आणि २८ डिसेंबर रोजी पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार महापालिका तर्फे मोठी तोडक कारवाई करण्यात आली.

खारघर मधील तळोजा फेज-२, रांजणपाडा रोड, खारघर मेट्रो स्टेशन आदी विविध ठिकाणी अनधिकृत पान टपऱ्या, झोपड्या, वडापाव दुकाने उभारण्यात आली होती. महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिलेल्या सुचनेनुसार प्रभाग समिती ‘अ'चे प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांनी अतिक्रमण विभागाच्या साह्याने मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये २७ डिसेंबर रोजी अनधिकृत पान टपऱ्या, झोपड्या, वडापाव दुकाने यांच्यावर तोडक कारवाई केली. यावेळी जेसीबी, डम्पर यांच्या साहाय्याने अनधिकृत १७ पान टपऱ्या, ३ वडापाव दुकाने, ३ हातगाड्या, ४ झोपड्या तोडण्याची कारवाई करण्यात आली.

याचबरोबर प्रभाग समिती ‘ड'चे प्रभाग अधिकारी रोशन माळी यांनी प्रभाग समिती ‘ड' अतिक्रमण विभागाच्या मदतीने २८ डिसेंबर रोजी ठाणा नाका, गार्डन हॉटेल परिसर, स्वामी नित्यानंद मार्ग, महापालिका मुख्यालय, नंदनवन कॉम्प्लेक्स जवळ, पनवेल बस स्थानकाबाहेर अतिक्रमण हटाव कारवाई केली. संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करण्यात आलेल्या अतिक्रमण प्रतिबंध कारवाईमध्ये १० अनधिकृत पान टपऱ्या, २ झोपड्यांवरती तोडक कारवाई करण्यात आली होती. संध्याकाळी पाच नंतरही अतिक्रमण विरोधी कारवाई सुरुच होती. मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये जेसीबीच्या सहाय्याने अनधिकृत पान टपऱ्या, हातगाड्या, अनधिकृत झोपड्या, वडापाव दुकानांवर तोडक कारवाई करण्यात आली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसराने घेतला मोकळा श्वास