मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
पनवेल मध्ये महापालिका तर्फे ११०० वृक्षांचे रोपण
पनवेल : ‘जागतिक पर्यावरण दिन'निमित्त पनवेल महापालिकेच्या वतीने ४८ उद्यानांमध्ये ११०० वृक्षरोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत खारघर, सेक्टर-१२ मधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके उद्यानामध्ये आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, मुख्य लेखाधिकारी मंगेश गावडे, लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी, महापालिका अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
माणूस निसर्गाचा पुत्र आहे. पर्यावरणाचा विकास करणे म्हणजे पर्यावरणांमध्ये ढवळाढवळ न करणे. निसर्ग आहे तसे त्याचे जतन करणे महत्वाचे आहे. म्हणूनच महापालिकाने ११०० झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे. यातही आपण देशी झाडांचे रोपण करत आहे. पुढच्या पिढीला पक्षांचे आवाज ऐकवायचे असतील झाडे लावली पाहिजेत, त्यांचे जतन करायला पाहिजे, असे आयुवत डॉ. रसाळ म्हणाले.
याबरोबरच महापालिका तर्फे कळंबोली, सेक्टर-६ ई मधील प्लॉट क्र.२ आयजीपीएल उद्यान येथे उपायुक्त कैलास गावडे, सेक्टर-११ नवीन पनवेल उद्यानामध्ये मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, प्रभाग अधिकारी अरविंद पाटील, आरोग्य निरीक्षक अरुण कांबळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. नावडे उपविभाग येथे सेक्टर-९ मध्ये उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, सेक्टर-१५ मधील उद्यानामध्ये लेखाधिकारी संग्राम व्होरकाटे, प्रभाग अधिकारी अमर पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कामोठे येथे उपायुक्त मारुती गायकवाड, कार्यकारी अभियंता संजय कटेकर, उप अभियंता राजेश कर्डिले, आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. पनवेल, सेक्टर-१६ मध्ये शहर अभियंता संजय जगताप, महात्मा गांधी उद्यानामध्ये सहाय्यक स्वरुप खारगे, कल्पतरु उद्यानामध्ये लेखा परीक्षक संदीप खुरपे, प्रभाग अधिकारी रोशन माळी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. याशिवाय इतर राहिलेल्या उद्यान्यांमध्ये ‘वृक्ष प्राधिकरण'च्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
दरम्यान, सदर वृक्षारोपणासाठी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. यामध्ये खारघरमध्ये इन्फिनिटी संस्था, पोदार प्रेप, पनवेलमध्ये भारत विकास परिषद, कळंबोली येथे ‘आई' शैक्षणिक आणि सामाजिक संघटना, कामोठेमध्ये पर्यावरण प्रेमी ग्रुप यांचे सहकार्य मिळाले.तसेच ट्युलिप अंतर्गत इंटर्नशिपसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी खारघर उद्यानामध्ये ‘पर्यावरणाचे रक्षण' याविषयावर लघुनाटिका सादर केली.
या वृक्षारोपणासाठी खास भारतीय प्रजातींची म्हणजेच वड,पिंपळ, कडुनिंब, ताम्हणफुल, नांद्रुक, आकाशनिंब, बहावा, अर्जुन, बिट्टी, अर्जुन, जांभूळ, करंज, पळस, प्राजक्त, सोनचाफा, अशोक, सप्तपर्णी, कुसूम, बकुळ, कदंब शिसव, सुबाभूळ, नारळ, सिता अशोक, शमी, आपटा अशी झाडे निवडण्यात आली होती. सदर वृक्षारोपण कार्यक्रमांतर्गत खारघर आणि नावडे प्रभागातील उद्यानांमध्ये ५११, कामोठे मधील ७ उद्यानांमध्ये ८३, पनवेल शहर आणि नवीन पनवेल मधील १८ उद्यानांमध्ये १६६, कळंबोली आणि खांदा कॉलनीतील १६ उद्यांनामध्ये ३३६ झाडांचे रोपण करण्यात आले.