कंत्राटी वीज कामगारांना न्याय द्या; अन्यथा राज्यात सरकार जगाव अभियान
उरण: ‘महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ'ची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक २५ आणि २६ मे रोजी वासुदेवानंद हॉल कुडाळ-सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेवून कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा. अन्यथा ‘महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ' महाराष्ट्र राज्यात ‘सरकार जगाव' अभियान आयोजित करुन न्याय हक्कांच्या करिता आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करावा लागेल, असा इशारा सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी दिला आहे.
‘भारतीय मजदूर संघ'चे प्रदेश सचिव हरी चव्हाण यांनी दीप प्रज्वलन केले. विधानसभा निवडणुकीपूर्वी संघर्षासाठी कामगारांनी तयारी सुरु करावी. शासन कामगारांसाठी असते, कंत्राटी पध्दत बंदची मागणी रास्त असल्याचे हरी चव्हाण म्हणाले. अनेक जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा संघटन मंत्री आणि जिल्हा कोषाध्यक्ष उपस्थित होते.
‘कृती समिती'च्या केंद्रस्थानी कंत्राटी कामगार असावा. त्यात राजकारण असता कामा नये. वीज उद्योगांतील कंत्राटी कामगारांना कंत्राटदार विरहीत शाश्वत रोजगार, सामाजिक सुरक्षा आणि लिविंग वेजेस मिळावे भरती प्रक्रियेमध्ये वयात सवलत आरक्षण मिळावे. उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनानुसार निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे महामंत्री सचिन मेंगाळे यावेळी म्हणाले
ई.एस.आय.सी., पीएफ आणि वीज कंपनी कार्यालयात असलेल्या प्रलंबित तक्रारी बाबत राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी जुलै मध्ये ‘सरकार जगाव' अभियान राबवून प्रत्येक जिल्ह्यात कंत्राटी कामगारांच्या मेळावे घेऊन संघटन मजबूत करण्याचे आवाहन संघटन मंत्री उमेश आनेराव यांनी केले.
ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिल्यानंतर देखील ‘महावितरण'चे व्यवस्थापकीय संचालकांनी वीज कंत्राटी कांमगारांच्या समस्या सोडवण्यासाठी ५ जून पूर्वी ‘कंत्राटी कामगार संघ'सोबत बैठक न घेतल्यास वीज कंपनीच्या वर्धापन दिनी ६ जून २०२४ रोजी राज्यभरातील कंत्राटी कामगार काळ्या फिती लावून प्रशासनाचा निषेध व्यक्त करतील, अशी माहिती ‘संघटना'चे अध्यक्ष निलेश खरात यांनी दिली.
सदर बैठकीचे आयोजन ‘संघ'चे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केले. तर सूत्रसंचालन राहुल बोडके यांनी केले.