महापालिका विभागनिहाय पार्कींग प्लॉट विकसीत करणार

नवी मुंबई : नवी मुंबई शहरापुढे पार्कींग समस्या दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी नियोजनबध्द पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्यादृष्टीने वारंवार त्यांनी आढावा बैठका घेत विभागनिहाय पार्कींग प्लॉट विकसीत  करण्याकडे विशेष लक्ष दिले आहे.

या अनुषंगाने सीबीडी-बेलापूर, सेक्टर-१५ मध्ये भूखंड क्र.३९ या ४७०५ चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर 4 मजली वाहनतळ विकसीत करण्यात आला असून येत्या काही कालावधीतच सदर वाहनतळ लोकांच्या वापरासाठी खुला होऊन या परिसरातील वाहनतळाची समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. येथे ३९६ चारचाकी आणि १२१ दुचाकी वाहनांच्या पार्कींगची व्यवस्था असणार आहे.

त्याचप्रमाणे सेवटर-१५ येथे प्लॉट क्र.७२ या ६९०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर तसेच सेक्टर-३० ए, वाशी येथे हॉटेल तुंगा समोरील ११३०० चौ. मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर वाहनतळ विकसीत करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. सदर भूखंडांवरील वाहनतळ शासन आणि खाजगी संस्था भागीदारी तत्वावर विकसीत करण्याच्या पर्यायांचा अंदाज घेण्यात येत असून त्यादृष्टीने अशाप्रकारे वाहनतळ विकसीत करण्याचे फायदे, यासाठी आवश्यक परवानग्या, त्या अनुषंगाने करावयाची कार्यवाही याबाबत आयुक्तांना अभियांत्रिकी विभागामार्फत माहितीपूर्ण सादरीकरण करण्यात आले.

सदर वाहनतळ खाजगी संस्था भागीदारी तत्वावर विकसित करण्याकरिता फिजीबिलिटी तपासून रिपोर्ट तयार करण्याचे काम मे. फिडबॅक इन्फ्रा प्रा. लि. या संस्थेमार्फत करुन घेण्यात येत असून या जागांचा वाहनतळासोबतच वाणिज्य वापरासाठीही उपयोग करणेबाबत पाहणी करण्यात येणार आहे.

सदर सादरीकरणामध्ये वाहनतळ विकसीत करण्यापूर्वी तेथील वाहतुकीची प्रत्यक्ष वर्दळ, वाहनतळाच्या जागेची रचना आणि उपलब्धता तसेच विद्यमान स्थितीत त्या परिसरात वाहने उभी करण्यासाठी वापरली जाणारी पध्दती अशा विविध बाबींचा अभ्यासपूर्ण अहवाल मांडण्यात आला. सद्यस्थितीत सदर भाग कार्यालये आणि इतर व्यावसायिक गोष्टीने गजबजलेला असल्याने वाहने उभी करण्यासाठी रस्त्यांच्या दोन्ही कडेकडील बाजुंचा वापर केला जात असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन वाहतुकीला बऱ्याच ठिकाणी अडचण निर्माण होत आहे. यावर उपाययोजनेच्या दृष्टीने दोन्ही वाहनतळ उपयोगी ठरणार आहेत. वाहनतळाचे नियोजन करताना विदयमान वाहनांच्या वाहतुकीचा विचार करण्यासोबतच या भागाचा आगामी कालावधीत होणारा विकास आणि त्यामुळे वाढणाऱ्या संभाव्य वाहनांच्याही विचार करण्याच्या सूचना आयुक्त नार्वेकर यांनी दिल्या.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, शहर अभियंता संजय देसाई, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेंद्र इंगळे, मालमत्ता विभागाचे उपायुक्त डॉ. राहुल गेठे, सहाय्यक संचालक नगररचना सोमनाथ केकाण, कार्यकारी अभियंता अरविंद शिंदे आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शासन आणि खाजगी संस्था भागीदारी तत्वावर वाहनतळ विकसीत केल्यास महापालिकेला आपला निधी यामध्ये गुंतवावा लागणार नाही, शिवाय महापालिकेला महसुलही प्राप्त होईल. या वाहनतळांचे दर नागरिकांना परवडणारे असावेत याचाही साकल्याने विचार करुन सद्यस्थितीत महापालिका मार्फत विविध ठिकाणी वाहनतळासाठी निश्चित केलेले दर यांचा तौलनिक अभ्यास करावा. शहरातील इतर भागांमध्येही वाहनतळ विकसीत करण्यासाठी नियोजन करतानाच सर्वेक्षण करुन त्याचा अहवाल जलद सादर करावा. - राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.

सद्यस्थितीत वाहनांचे प्रमाण मोठया संख्येने वाढले असून सर्वच शहरांसमोर गाड्यांच्या पार्कींगची बिकट समस्या उभी असल्याचे आढळून येते. नवी मुंबई शहरातही वाहने उभी करण्याची समस्या असून ती दूर करण्यासाठी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर बारकाईने लक्ष देत आहेत. महापालिकेचे संबंधित विभाग तसेच वाहतूक पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्यासमवेत नियमित आढावा बैठकांचे आयोजन करुन या कामाला गती देत आहेत.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘परकाव्यवाचन स्पर्धा'द्वारे मराठीतील समृध्द काव्यपरंपरेचे दर्शन