पनवेल रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना मज्जाव

नवीन पनवेल : रेल्वे प्रशासनाच्या सौम्य भूमिकेमुळे पनवेल रेल्वे स्थानक परिसरात शिरुन प्रवाशांचा रस्ता अडविणाऱ्या तीन आसनी रिक्षा चालकांवर दोन दिवसांपासून निर्बंध आले आहेत. रेल्वे स्थानक हद्दीत रिक्षांना बंदी करण्यात अअल्यामुळे रेल्वे स्थानक परिसर मोकळा झाला आहे. दोन दिवसांपूर्वी स्थानक परिसरात झालेल्या वादामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने रेल्वे प्रवाशांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.

पनवेल रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जाणे प्रवाशांना अडचणीचे आहे. १५ मीटर रस्ता असताना प्रवाशांना पायी स्थानक परिसरात जाणे शक्य होत नाही. या रस्त्यावर तीन आसनी रिक्षांची मोठी गर्दी असते. एक, दोन नव्हे तर तीन वेगवेगळ्या रांगा लावून रिक्षा चालक उभे असतात. रेल्वे प्रशासनाच्या मालकीची जागा असल्यामुळे वाहतूक पोलीस लक्ष देत नसल्यामुळे पनवेल रेल्वे स्थानकातून लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल होत होते. लोहमार्ग पोलिसांकडेही याची जबाबदारी नाही आणि रेल्वे प्रशासनाकडून कठोर भूमिका घेतली जात नसल्याने तीन आसनी चालकांचे चांगलेच फावले होते.

परंतु, दोन दिवसांपासून रेल्वेच्या मालकीच्या जागेत रिक्षा चालकांना मज्जाव करुन संपूर्ण परिसर मोकळा केल्यामुळे दररोज कसाबसा रस्ता काढणाऱ्या प्रवाशांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सदर ठिकाणी बॅरिकेटस्‌ लावून महापालिकेच्या वॉर्डनची नियुक्ती करुन रिक्षा चालकांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. त्यामुळे सार्वजनिक रस्त्यावर गर्दी झाली असली तरी प्रवाशांना स्थानक परिसरात मोकळेपणाने चालता येत असल्याने प्रवाशांनी पोलिसांचे आभार मानले आहेत.

१९ जानेवारी रोजी पनवेल स्थानक परिसरात दोन गटांमध्ये वाद झाला होता. या वादाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरल्यामुळे वाद वाढण्याची चिन्हे लक्षात घेऊन पोलिसांनी रिक्षांना रेल्वे स्थानकात बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. रिक्षांना प्रवेशद्वारातच अडवल्यामुळे लोकलच्या प्रवाशांना वाट मोकळी झाली असली तरी लांब पल्ल्याच्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रास होत आहे. कोणतीही रिक्षा, गाडी आत येत नसल्याने प्रवाशांना पायी चालत जावे लागत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आज नवी मुंबई मध्ये ‘भगवे वादळ'