नेरुळ गावातील ‘सासन काठी'ला ५९ वर्षांची परंपरा

वाशी : चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. हिंदू वर्षातील पहिला सण म्हणजे गुढीपाडवा!. वर्षातील साडेतीन मुहूर्तांपैकी पहिला मुहूर्त म्हणजे गुढीपाडवा!. गुढीपाडवा दिवसाने चैत्र महिन्याला सुरुवात होते. चैत्र महिन्याची चाहुल लागताच गावोगावी ग्रामदेवता, देवी-  देवतांच्या यात्रांना प्रारंभ होतो. यात ग्रामस्थ विविध प्रकारे आपल्या देवाला मान देतात. गुढीपाडवा दिनी नेरुळ गावातील ग्रामस्थ आपल्या रक्षणकर्त्या  झोटिंग देवाला सासन काठी नाचवून मान देतात. नेरुळ गावात सासन काठी नाचवण्याची परंपरा १९६५ पासून सुरु आहे.

सासन काठी म्हटल्यावर सर्वांना पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी  असलेली जोतिबा डोंगरावरची यात्रा आठवते. मात्र, नवी मुंबई सारख्या आधुनिक शहरात देखील ‘सासन काठी'चा मान देण्याची परंपरा आहे. नवी मुंबई शहर वसण्यापूर्वी येथे गावे होती. या प्रत्येक गावाचे रक्षण करण्यासाठी गावदेवी तसेच वेशीवरील देव आहेत, अशी अख्यायिका असून आजही या देव-देवतांना मान देऊन त्यांची मनोभावे पूजा केली जाते. नेरुळ गावाचे रक्षण करण्यासाठी झोटिंग देव उभा असल्याच्या अख्यायिकातून झोटिंग देवाला नेरुळ गावातील ग्रामस्थ प्रत्येक लग्नावेळी मान देतात. तर गुढीपाडवा दिवशी झोटिंग देवासाठी  नेरुळ गावातील ग्रामस्थ आणि श्री समर्थ मित्र मंडळ यांच्या माध्यमातून सासन काठी नाचवली जाते. देवाची पूजा करुन सासन काठी नेरुळ गावच्या वेशीसह प्रत्येक आळीत ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत फिरवली जाते.१९६५ साली सुरु झालेली सासन काठी नाचविण्याची परंपरा मागील ५९ वर्षांपासून अखंडीत सुरु आहे, अशी माहिती ‘श्री समर्थ मित्र मंडळ'चे सभासद जयंत म्हात्रे यांनी दिली. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी फळ मार्केटमध्ये परदेशी फळांना वाढती मागणी