अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टरवर महापालिका द्वारे कारवाई

पनवेल :  पनवेल महापालिका हद्दीतील राजकीय तसेच अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टरवर महापालिकेकडून लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महापालिका मुख्यालयातून राजकीय तसेच अनधिकृत बॅनर, होर्डिंग्ज, पोस्टर कारवाई करण्याचे आदेश सर्व महापालिका प्रभाग कार्यालयांना देण्यात आले असून, त्यासाठीचा फौजफाटा आणि मनुष्यबळ वाढविण्यात आले आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत आदर्श आचार संहितचे पालन महापालिका द्वारे काटेकोरपणे केले जाणार आहे, अशीही ग्वाही महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली.

लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त डॉ. वैभव विधाते तसेच सर्व प्रभाग अधिकारी यांनी १७ मार्च रोजी सर्व प्रभागांची पहाणी केली. या पहाणीवेळी राहिलेल्या त्रुटी सुधारुन उर्वरित सर्व बॅनर, पोस्टर तातडीने काढण्याची सूचना देतानाच, कारवाई दरम्यान हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना दिला आहे.

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीची (२०२४) आदर्श आचारसंहिता १६ मार्च रोजी लागू होताक्षणीच महापालिका कार्यक्षेत्रातील परिसरात लावण्यात आलेले सार्वजनिक ठिकाणाचे राजकीय पक्षांचे फोटो, पलेक्स, झेंडे, होडिंग्ज, अनधिकृत बोर्ड, बॅनर्स, कटआऊट्‌स, अंतर्गत भिंतीवरील लेखन, पोस्टर्स राजकीय पक्षांच्या जाहीराती तसेच इतर कोणत्याही प्रकाराचे प्रचार साहित्य असल्यास काढून टाकण्याची तातडीने कार्यवाही करण्याबाबत निवडणूक आयोगाचे आदेश येताच महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी याबाबत सर्व प्रभाग अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार १७ मार्च रोजी महापालिका कार्यक्षेत्रातील सुमारे २ हजार ४४८ बॅनर्स, ४ हजार २१० झेंडे, ७२ होर्डिंग्ज आणि ५३५ मोठे पोस्टर्सवर महापालिका तर्फे कारवाई करण्यात आली आहे.

कळंबोली मधील राजकीय पक्षांच्या तीन कंटेनर कार्यालयांवरती कारवाई करुन, सदर कंटेनर उचलण्यात आले.

देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने सार्वत्रिक लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर अनधिकृत बॅनरबाजीला महापालिका द्वारे लगाम घातला जाणार आहे. - गणेश देशमुख, आयुवत - पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पाणी कनेक्शन नसतानाही पाणीपट्टीचे बिल