नवी मुंबईत ७७ मोठ्या नैसर्गिक नाल्यांची १०० टक्के सफाई
नालेसफाई कामांची महापालिका आयुक्तांकडून पुनर्पाहणी
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नैसर्गिक नालेसफाई अंतिम टप्प्यात असून महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी २८ मे रोजी नवी मुंबईच्या उत्तरेकडील दिघा, ऐरोली विभागापासून नालेसफाई कामांच्या प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात करीत अधिक सखोल नालेसफाई करण्याचे निर्देश दिले.
यावर्षी कुठेही पाणी साचून राहणार नाही असा दिलासा नागरिकांना देताना आयुक्त डॉ. शिंदे यांनी ७७ मोठ्या नैसर्गिक नाल्यांची १०० टक्के सफाई पूर्ण झाली असून उर्वरित १९ मोठ्या नाल्यांची साधारणतः ३० टक्के राहिलेली सफाई येत्या ५ दिवसात पूर्ण होईल, असे सांगितले.
यापूर्वी आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी दिघा विभागाच्या पावसाळापूर्व पाहणीमध्ये दिलेल्या सुचनांच्या अनुषंगाने कामे झाली आहेत काय? याची पुनर्पाहणी केली. दिघा भाग काहीसा सखल आहे. तसेच इलठणपाडा येथील धरणाचा विसर्ग पश्चिमेकडील खाडीकडे वाह येताना मध्ये झोपडपट्टी, एमआयडीसी भागातील नाले काहीसे अरुंद असल्याने त्यांची सखोल सफाई होणे गरजेचे आहे. सदर बाब लक्षात घेऊन नाल्यातून खाडीत वाहून जाणारे पाणी विनाअडथळा वाहून जाण्याच्या दृष्टीने नालेसफाईची पाहणी करीत आयुवतांनी अधिक सखोल नालेसफाईचे निर्देश दिले.
यावेळी काही ठिकाणी नाल्यांमधून जाणाऱ्या केबल्समुळे प्रवाहात कचरा अडून राहू शकतो, असे लक्षात घेत त्याठिकाणी चॅनल टाकावेत आणि केबल त्यावर बांधून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. त्याचप्रमाणे नाल्यांच्या काठांच्या भिंतीवर उगवलेली रोपटीही काढून टाकावीत, असे आयुवत डॉ. शिंदे यांनी सूचित केले.
नालेसफाई प्रमाणेच परिसर स्वच्छतेकडेही काटेकोर लक्ष द्यावे. स्वच्छता आपल्या शहराची ओळख असल्याने स्वच्छतेबाबत कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही. रस्त्यांच्या शेजारील हरितपट्टे तसेच सुशोभित जागा यांची नियमित निगा राखण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. तसेच पदपथ नागरिकांना चालण्यासाठी विनाअडथळा खुले राहतील, त्यावरील झाकणे तुटली असतील तर ती तातडीने बदलून घ्यावीत, असे निर्देश आयवत शिंदे यांनी दिले.
दरम्यान, नवी मुंबई शहरातील पावसाळापूर्व कामांची सद्यस्थिती २७ मे रोजी विशेष आढावा बैठकीमध्ये संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. त्यानंतर २८ मे रोजी त्यांनी दिघा, ऐरोली विभागापासून प्रत्यक्ष पाहणीला सुरुवात केली.
नालेसफाई जलद गतीने करताना योग्य रितीने आणि संपूर्ण स्वच्छता होईल याकडे बारकाईने लक्ष देऊन करावी. यामध्ये कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही. नालेसफाई करणारे कामगार गमबुट, हँडग्लोव्हज् अशी सुरक्षा साधने वापरुनच काम करीत असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच नाल्यांची सफाई होत असताना त्यातून काढला जाणारा गाळ लगेच उचलण्यात यावा. काही नाल्यांचे डिसेल्टिंग करणे आवश्यक असल्याचे निदर्शनास आले असून तेही काम लगेचच पूर्ण करुन घेण्यात यावे. - डॉ. कैलास शिंदे, आयुवत-नवी मुंबई महापालिका.