पनवेल  महापालिका तर्फे पीसीपीएनडीटी, एमटीपी कायद्याविषयी जनजागृती कार्यशाळा

पनवेल : राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत गर्भधारणा आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ (पीसीपीएनडीटी ॲक्ट) तसेच वैद्यकिय गर्भपात कायदा (एमटीपी ॲक्ट) कायद्याबाबत संवेदीकरण करण्याच्या दृष्टीने तसेच माता मृत्यू आणि बालमृत्यू टाळण्याकरिता करण्यात येणाऱ्या उपाययोजना याबाबत पनवेल महापालिका वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली एक दिवसीय कार्यशाळेचे ३० मे रोजी पनवेल मधील ज्येष्ठ नागरिक संघ येथे करण्यात आले होते.

या कार्यशाळेत पीसीपीएपडीटी कायद्याबाबतच्या तरतूदी, त्यातील बदल याबाबत विधी सल्लागार ॲड. अर्चना शेगांवकर आणि एमटीपी कायद्याबाबत डॉ. संतोष जायभाये यांनी मार्गदर्शन केले. महापालिकाचे मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गोसावी, डॉ. गिरीश गुणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनिषा चांडक, डॉ. माया काळे, डॉ.वाळके तसेच सर्व वैद्यकिय अधिकारी, महापालिका कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी सेंटर्सचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 यावेळी मार्गदर्शन करताना विधी सल्लागार ॲड. अर्चना शेगांवकर यांनी गर्भधारणा आणि प्रसुतीपूर्व निदान तंत्र लिंग निवड प्रतिबंध कायदा १९९४ या कायद्याची उद्दिष्टे या कायद्यांतर्गत रजिस्ट्रेशन, सोनोग्राफी केंद्र सुरु करण्यासाठी आवश्यक ट्रेनिंग, सोनोग्राफी मशीन निर्लेखन, केंद्रामधील आवश्यक सूचना फलक, रुग्णाचे रेकॉर्ड, अल्ट्रा साऊंड मशीनची खरेदी-विक्री, पोर्टेबल मशीनची माहिती, पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत मिळणारी शिक्षा या संबंधी त्यांनी माहिती दिली.

तसेच डॉ. संतोष जायभाये यांनी वैद्यकिय गर्भपात कायदा-२०२१ची वैशिष्ट्ये, सुरक्षित गर्भपाताचे निकष, या कायद्यातील पूर्वीच्या तरतुदी आणि २०२१ मध्ये बदललेल्या तरतुदी, गोपनीयता आणि सुरक्षितता अशा विविध घटकाची माहिती दिली. तसेच उपस्थितींच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

तर पनवेल महापालिका प्रशासनाने महापालिका कार्यक्षेत्रात शून्य माता मृत्यू आणि शून्य बाल मृत्युचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यासाठी खाजगी रुग्णालयांनी महापालिकेला सहकार्य करावे. तसेच खाजगी रुग्णालातील पीसीपीएनडीटी केंद्रे आणि एमटीपी केंद्रे यांनी ‘बेटी बचाओ' या आंदोलनात सहभागी होऊन मदत करावी. स्त्री भ्रूण हत्या संदर्भात जनजागृती करावी, असे आवाहन मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. आनंदा गोसावी यांनी केले.

डॉ. गिरीश गुणे यांनी पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये  मातामृत्यू व बालमृत्यू रोखण्यासाठी उपस्थित रुग्णालयाच्या संचालकांना मदतीचे आवाहन केले. तसेच मातामृत्यू आणि बालमृत्यू कमी करण्यासाठी प्रशासनासोबत एकत्रित उपाययोजना राबविण्यासाठी सहकार्य करावे, असे त्यांनी सांगितले.

यावेळी महापालिका कार्यक्षेत्रातील विविध रूग्णालयातील सोनोग्राफी केंद्रे आणि खाजगी सोनेग्राफी केंद्रांच्या प्रतिनीधींनी  त्यांच्या विविध शंकांचे निरसन केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई महापालिकेच्या सर्व रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट  करा ; जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांची मागणी