‘सिडको-नैना अतिक्रमण विभाग'च्या कारवाईबाबत संशय
उरण : विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील प्रांजली या गोदामावर सिडको-नैना प्राधिकरण विभागाच्या अतिक्रमण विभागाने ७ जून रोजी कारवाई चा बडगा उगारला खरा; मात्र कारवाई होऊन काही तासांचा अवधी लोटत नाही तोच सदर ठिकाणी मालाची हाताळणी करणाऱ्या गोदाम व्यावसायिकांनी गोदामांचे नव्याने बांधकाम सुरु करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे ‘सिडको-नैना प्राधिकरण विभाग'च्या कारवाईतून संशयाचा धूर निघत आहे.
उरण तालुक्यातील चिर्ले, वेश्वी, दिघोडे, विंधणे, चिरनेर, मोठी जुई, कळंबुसरे, कोप्रोली, पिरकोन, सारडे यासह इतर ग्रामपंचायत हद्दीतील गावांमध्ये मोठ्या प्रमाणात मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामांची बांधकामे उभी राहत आहेत. तसेच याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे राजरोसपणे सुरु आहेत. सदर बांधकामे शासनाच्या नियमानुसार होत नसल्याने ती बांधकामे हटविण्यात यावी यासाठी संबंधित गावकरी, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संस्था कोकण विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी-रायगड, सिडको, तहसील कार्यालय, नैना प्राधिकरण, कस्टम, स्थानिक ग्रामपंचायत कार्यालयाकडे तक्रार दाखल करत आहेत.
मात्र, अशा तक्रार अर्जांची छाननी किंवा दखल संबंधित प्रशासनाचे अधिकारी घेत नसल्याने या ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यात ‘नैना'च्या अधिकाऱ्यांनी एकाला धर आणि दुसऱ्याला पळ अशी नियमावली तयार केल्याने ‘मनसेे'चे चिरनेर विभाग अध्यक्ष संदीप ठाकूर यांनी विंधणे ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील पोई येथील प्रांजली या गोदामावर कारवाई करण्यासंदर्भातील तक्रार अर्ज ‘सिडको-नैना प्राधिकरण विभाग'च्या अधिकाऱ्यांकडे केली होती. सदर तक्रार अर्जांची दखल घेऊन ‘सिडको-नैना अतिक्रमण विभाग'च्या अधिकाऱ्यांनी घेऊन ७ जून रोजी सदर अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. मात्र, सदरची कारवाई होऊन काही तासांचा अवधी लोटत नाही तोच ८जून रोजी सदर गोदाम व्यावसायिकांनी पुन्हा नव्याने बांधकाम सुरु केले आहे. त्यामुळे ‘सिडको-नैना अतिक्रमण विभाग'च्या सदर कारवाईकडे संदर्भात संशयाने बघितले जात आहे.
दरम्यान, यासंदर्भात ‘सिडको-नैना अतिक्रमण विभाग'चे अधिकारी चौरले यांच्याकडे विचारणा केली असता ते सुट्टी असल्याने नाशिक या ठिकाणी जात असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.