उड्डाणपुलाखालील इको-मिनीडोअर स्टॅन्ड हटवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील

नवीन पनवेल : पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील इको -मिनीडोअर स्टॅन्ड हटवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. प्रशासनाच्या या भूमिकेविरोधात ‘इको-मिनीडोअर संघटना'ने इको मिनीडोअर सेवा बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. दरम्यान, प्रशासनाविरोधात चालक-मालक आक्रमक झाले आहेत.

पनवेल तालुक्यातील अनेक सुशिक्षित बेकार तरुण इको-मिनीडोअर चालवून आपला उदरनिर्वाह करतात. गेली २५ ते ३० वर्षांपासून ते आपला व्यवसाय करीत आहेत. मात्र, प्रशासनाकडून पनवेल शहरातील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखालील इको मिनिडोअर स्टॅन्ड बंद करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आलेले आहेत. त्याच्या निषेधार्थ इको-मिनिडोअर चालकांनी ३ जून रोजी आपला व्यवसाय बंद ठेवून प्रशासनाच्या विरोधात आवाज उठवला. कोणत्याही परिस्थितीत आम्ही सदरचा स्टँड बंद होऊ देणार नाही अन्यथा कुटुंबियांसह उपोषणाला बसण्याचा निर्धार त्यांनी यावेळी केला.

सदर ठिकाणी जवळपास ४०० ते ५०० इको चालक प्रवाशांना ने-आण करण्याचे काम करतात. आमच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेतल्यास आम्ही काय करायचे? असा सवाल यावेळी इको चालकांनी उपस्थित केला. या आंदोलनावेळी शेकडो इको चालक-मालकांनी घोषणाबाजी करत प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. न्याय मिळेपर्यंत आम्ही लढाई लढणार असल्याचे ‘इको-मिनीडोअर चालक-मालक संघटना'चे रायगड जिल्हा अध्यक्ष विजय पाटील यांनी सांगितले. यावेळी ‘वंदे मातरम्‌ टॅवसी संघटना'चे अध्यक्ष रवी नाईक, उपाध्यक्ष दीपक नावडेकर, अंकुश पाटील, गोरख देशेकर, हेमंत म्हात्रे, दीपक उलवेलर, विश्वनाथ गडगे यांच्यासह अनेक पदाधिकारी  उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 आंबा कोयी संकलन उपक्रमाला नागरिकांचा उत्साही प्रतिसाद