पाणीबिल वसुलीसाठी महापालिका तर्फे धडक कारवाई

तुर्भे  ः नवी मुंबई महापालिका पाणीपुरवठा विभाग मार्फत पाणी बिल वसुलीसाठी धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. यानुसार नोटीसा बजावूनही पाणीबिल न भरणाऱ्या थकबाकीदार ग्राहकांची नळ जोडणी खंडित करण्यात येत आहे, अशी माहिती महापालिका अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी दिली.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील नागरिकांना महापालिकेच्या मोरबे धरणातून ३८३ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा तसेच एमआयडीसी द्वारे ६८ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई मधील रहिवाशांना दररोज एकूण ४५१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. मोरबे धरणातील पाणी शुध्द करून  महापालिकेच्या सीबीडी ते दिघापर्यंतच्या क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यातून पाणी पुरवण्याकरिता कोट्यवधी रुपयांचा खर्च होत आहे. त्या तुलनेत नवी मुंबईमध्ये सर्वच नळजोडणी ग्राहकांना अल्प प्रमाणात पाणी बिल आकारले जात आहे. या पार्श्वभूमीवर काही ग्राहकांकडून पाणी बिल भरण्यास टाळाटाळ केली जाते किंवा पाणी बिल अनेक महिने प्रलंबित ठेवले जाते. त्यामुळे प्रत्येक दोन महिन्यांच्या बिल सायकलनंतर पाणीपुरवठा विभागाकडून संबंधित अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांवर नळजोडणी खंडित करण्याची कटू कारवाई करण्याची वेळ येते.

सध्या पाणी बिल न भरणाऱ्या २ हजार ८९२ ग्राहकांना नळजोडणी खंडित करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. या ग्राहकांकडे एकूण थकीत पाणी बिल २७ कोटी ४१ लाख रुपये होते. नोटीस बजावण्यात आल्यावर नोटीसीची मुदत संपताच महापालिकेचे नळजोडणी खंडित करणारे पथक संबंधित ग्राहकाच्या घरी धडकत होते. तसेच थकबाकी भरल्याचे बिल दाखवण्याची मागणी ग्राहकाकडे करुन थकबाकी न भरल्याने नळजोडणी खंडित करण्यासाठी आल्याची सूचना ग्राहकांना दिली जात होती. आता आपले पाणीच बंद होणार असल्याचे लक्षात घेऊन शेकडो ग्राहकांनी त्वरित ऑनलाईन किंवा ऑफ लाईन पाणी बिल भरुन महापालिका कर्मचाऱ्यांना दिले. परिणामी अनेकांच्या नळ जोडणी खंडित न होता केवळ पथक कारवाईला आले आहे, असे निदर्शनास येताच पाणी बिल थकबाकीदारांनी त्वरित पाणी देयके भरल्याने कोट्यवधी रुपयांची पाणी बिलाची वसुली झाली आहे.

दरम्यान, पाणी बिल न भरणाऱ्या ३७० रहिवाशांची नळजोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून एकूण १ कोटी ५२ लाख रुपये पाणी बिल वसूल करण्यात आले. महापालिका पाणी पुरवठा विभाग द्वारे फेब्रुवारी-२०२४ अखेरपर्यंत ७६ कोटी ८९ लाख रुपये पाणी बिलाची वसुली झाली आहे, असे महापालिका अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात पाण्याचा वापर करणाऱ्या घरगुती ग्राहकांची संख्या १ लाख २६ हजार ५९२,  वाणिज्य ग्राहकांची संख्या ९ हजार ८९९ आणि संस्थात्मक ग्राहकांची संख्या ५११ इतकी आहे. महापालिका पाणीपुरवठा विभागाला पाणी बिलापोटी २०२३-२४ या वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पामध्ये १०३ कोटी ३७ लाख रुपये महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, सुधारित अर्थसंकल्पात ९५ कोटी ८३ लाख रुपये इतका महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच २०२४-२५ या वर्षाच्या मूळ अर्थसंकल्पामध्ये  १०० कोटी १४ लाख रुपयांचा महसूल जमा करण्याचे उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे. -  मनोज पाटील, अतिरिक्त शहर अभियंता - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘पलेमिंगो'चे आवडता डीपीएस तलाव रिअल इस्टेट विकासासाठी मोकळा?