मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
वृक्षारोपण, स्वच्छता कार्यक्रमांद्वारे नवी मुंबईत पर्यावरण दिन साजरा
नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या वतीने ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन व्यापक प्रमाणात लोकसहभाग घेऊन मोठया प्रमाणात वृक्षलागवड करत साजरा करण्यात आला. आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केलेल्या आवाहनास अनुसरुन विद्यार्थी, महिला, युवक, प्रौढ आणि ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच निसर्गप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांनी आठही विभागांतील वृक्षारोपण आणि स्वच्छता कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.
या दिवशी विविध ठिकाणी ५ हजाराहुन अधिक स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. त्याचप्रमाणे महापालिकेने केलेल्या आवाहनानुसार १५० हून अधिक संस्था आणि व्यक्ती यांनी उद्यान विभागाशी संपर्क साधून अर्ज करीत वृक्षरोपे तसेच वृक्षारोपणासाठी योग्य जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यानुसार साधारणतः १२ हजार देशी वृक्षरोपांचे वाटप करण्यात आले.
यामध्ये विशेषत्वाने नेरुळ पोलीस स्टेशन समोरील मोकळ्या जागेत बांबुच्या ३७५ झाडांची लागवड करण्यात आली. तसेच ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे २५०० बांबुची आणि २५० जांभूळ झाडांची लागवड करण्यात आली आहे. बेलापूर पामबीच येथे २५० बांबुची तर सानपाडा, सेवटर-१० मधील संवेदना उद्यान येथे ६५ देशी प्रजातींची करंज, ताम्हण, बहोनिया, एलोस्निया, बेलपत्र अशी झाडे लावण्यात आली आहेत. तुर्भे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी ५०० हुन अधिक इतक्या मोठ्या संख्येने आकाशनिंब, पिंपळ, वड, गुलमोहर, आवळा अशा पानाफुलांनी बहरणाऱ्या मोठ्या झाडांची लागवड करण्यात आली असून निसर्ग उद्यान, कोपरखैरणे येथे प्रामुख्याने ५०० आंब्याची झाडे लावण्यात आली आहेत.
सीबीडी, सेवटर-२ मधील सुनील गावस्कर मैदान येथे बकुळ ताम्हण आदि ४० झाडांची लागवड करण्यात आली असून सेंट्रल पार्क-घणसोली येथे बकुळ, कडूनिंब, पिंपळ, अर्जुन, आंबा, पारिजातक, चाफा, टॅबोबिया, कांचन, करंज अशा विविध प्रकारच्या ६५ झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले आहे. पामबीच रोड घणसोली येथेही बकुळ, अर्जुन, कांचन, कडुनिंब, पारिजातक, टॅबोबिया अशा देशी झाडांची २५ वृक्षरोपे लावण्यात आली आहेत. ऐरोली, सेक्टर-१४ येथे नमुंमपा शाळा मैदान आणि पटनी रोड येथे साधारणतः ३७५ कडुनिंबाच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. दिघा येथील साने गुरुजी उद्यानातही जांभूळ, ताम्हण, कडुनिंब, आकानिम आणि निलगिरी अशा ६५ देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली आहे. याशिवाय शहरातील विविध स्वयंसेवी संस्था, शाळा-महाविद्यालये यांनीही आपल्या स्तरावर पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण आणि अनुषांगिक कार्यक्रमांचे ठिकठिकाणी आयोजन केले होते.
नवी मुंबई महापालिका उद्यान विभागाच्या वतीने शहराच्या वृक्षसंवर्धनासाठी सुयोग्य नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये प्रामुख्याने फळेफुले देणाऱ्या आणि पक्ष्यांना आकर्षित करणाऱ्या आणि त्याद्वारे नवी मुंबईच्या जैवविविधतेत भर घालणाऱ्या स्थानिक देशी प्रजातींच्या वृक्षांचीच लागवड करण्यात येत आहे. - दिलीप नेरकर, उपायुवत-उद्यान विभाग, नवी मुंबई महापालिका.