कस्टम व सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून महिलेकडुन उकळली 1 लाखांची रक्कम    

नवी मुंबई : कस्टम व सायबर क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याचे भासवून एका सायबर टोळीने ऐरोलीतील आयटी कंपनीत कामाला असलेल्या एका महिलेच्या आधार कार्डचा मनी लाँड्रींगसाठी वापर झाल्याची भिती दाखवून, त्यांची रक्कम आरबीआयच्या खात्यात सुरक्षीत ठेवण्याच्या बहाण्याने या महिलेकडुन 98 हजाराची रोख रक्कम उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. रबाळे पोलिसांनी या प्रकरणातील सायबर टोळी विरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे. 

 या प्रकरणातील 36 वर्षीय महिला कांजुरमार्ग येथे राहण्यास असून त्या ऐरोलीतील आयटी कंपनीत कामाला आहेत. गत 14 फेब्रुवारी रोजी त्या आपल्या कामावर असताना, अज्ञात सायबर टोळीतील एका सदस्याने कस्टम मधील अधिकारी असल्याचे भासवून स्काईप या ऍपवरुन व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. तसेच थायलंडवरुन त्यांच्या नावाने 140 किलोग्रॅम एमजीएमकए, 5 वैधता संपलेले पासपोर्ट व 4 डेबिट कार्ड या अवैध वस्तुंचे पार्सल आल्याचे सांगून त्यासाठी त्यांच्या आधारकार्डचा वापर करण्यात आल्याचे सांगितले. सदर पार्सल त्यांनी मागवले नसल्याचे सांगितल्यानंतर या सर्व अवैध वस्तुंचा त्यांना त्रास होईल अशी भिती दाखवली. तसेच सदर कॉल सायबर क्राईमला कनेक्ट करुन देत असल्याचा बहाणा करुन त्यांच्याकडे तक्रार करण्यास सांगितले.  

 त्यानंतर सायबर क्राईम ब्रँचमधील अधिकारी असल्याचे भासवून दुसऱया सायबर चोरटयाने या महिलेला अंधेरी येथील ब्रँचला भेट देण्यास सांगितले. या महिलेने तेथे येणे शक्य होणार नसल्याचे सांगितल्यानंतर सायबर चोरटयाने त्यांना ऑनलाईन तक्रार नोंद  करत असल्याचे सांगून त्यांना आधारकार्ड पाठवण्यास सांगितले. या महिलेने आधारकार्ड पाठवल्यानंतर त्यांच्या आधारकार्डवरुन वेगवेगळे खाते उघडण्यात आल्याचे व त्यावरुन मनी लाँड्रींग होत असल्याचे सांगितले. त्यानंतर स्वामी नावाचा डीसीपी असल्याचे भासवून आणखी एका सायबर चोरटयाने या महिलेशी संपर्क साधला. त्याने या महिलेचे  अकाऊंट फ्रिज होणार असल्याचे सांगितले.  

त्यानंतर या सायबर चोरटयाने सदर महिलेला बोलण्यात गुंतवून त्यांची रक्कम सुरक्षीत राहणार असल्याचा विश्वास दाखवून त्यांना आरबीआयच्या अकाऊंटवर पैसे पाठवण्यास सांगितले. त्यामुळे या महिलेने 98 हजाराची रक्कम पाठवून दिल्यानंतर सदर फोन कट झाला. त्यामुळे या महिलेने सदर नंबरवर पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, सदरचा फोन लागला नाही. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे या महिलेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी रबाळे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

हिंदू नावाने बनावट कागदपत्र बनवून वास्तव्य; बांग्लादेशी दाम्पत्य गजाआड