ठाणे मधील विविध विकास प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
‘पोलीस कल्याण रोजगार मेळावा'ला पोलीस पाल्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
पहिल्याच रोजगार मेळाव्यात ३७० पोलीस पाल्यांना नोकरी उपलब्ध
नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलात तसेच इतर पोलीस घटकांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या त्याचप्रमाणे मृत झालेल्या पोलीस अधिकारी आणि अंमलदारांच्या पाल्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पोलीस कल्याण रोजगार मेळाव्यात १६७ पोलीस पाल्यांना नोकरी उपलब्ध करुन देण्यात आली. यातील १० पोलीस पाल्यांना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. याप्रसंगी अपर पोलीस आयुक्त दीपक साकोरे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.
‘नवी मुंबई'चे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या संकल्पनेतून पहिल्यांदाच ‘नवी मुंबई पोलीस कल्याण शाखा'च्या वतीने २८ डिसेंबर रोजी नेरुळ मधील आगरी-कोळी भवन येथे पोलीस पाल्यांसाठी ‘पोलीस कल्याण रोजगार मेळावा'चे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यासाठी नोकरीची आवश्यकता असलेल्या २०७९ इतक्या पोलीस पाल्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ९१५ पोलीस पाल्य प्रत्यक्षात या मेळाव्यात हजर राहिले होते. यात अनुभवी आणि फ्रेशर उमेदवारांचा समावेश होता. सदर मेळाव्यात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई हद्दीतील एकूण ५५ कंपन्यांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या हस्ते १० पोलीस पाल्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
त्याचप्रमाणे इतर १५७ पोलीस पाल्यांना उपस्थित असलेल्या विविध कंपन्यांनी मुलाखती घ्ोवून रोजगार उपलब्ध करुन त्याबाबतचे नियुक्तीपत्रे दिली. तर २१४ पोलीस पाल्यांची कंपन्यांकडून मुलाखतीच्या दुसऱ्या फेरीकरिता निवड करण्यात आली. यावेळी परिमंडळ-१चे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे, परिमंडळ-२चे उपायुक्त पंकज डहाणे, पोलीस मुख्यालय उपायुक्त संजयकुमार पाटील, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे, वाहतूक विभागाचे उपायुक्त तिरुपती काकडे उपस्थित होते. सदर ‘पोलीस कल्याण रोजगार मेळावा'मध्ये सहभागी झालेल्या सर्व कंपनी प्रतिनिधी आणि जॉब केस या संस्थेचे संचालक श्रीराम सातपुते यांचा सन्मान करण्यात आला.
एम.पोलीस जॉब या मॉड्युलचे अनावरण
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात कार्यरत असलेल्या पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या पाल्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नोकरी मिळण्यासाठी ऑनलाईन पध्दतीने आवश्यक ती माहिती भरुन सहजरित्या रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकरून एम.पोलीस जॉब असे मॉड्युल तयार करण्यात आले आहे. एम.पोलीस कार्यप्रणाली अंतर्गत असलेल्या एम.पोलीस जॉब मॉड्युलचे अनावरण पोलीस आयुक्तांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
सन २०२३ मध्ये ‘नवी मुंबई पोलीस कल्याण शाखा'कडून महाराष्ट्र पोलीस कुटुंब आरोग्य योजना अंतर्गत २६६ पोलीस अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या कुटुंबियांना मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली. त्याचप्रमाणे १६ लाख ६३ हजार रुपये इतके शैक्षणिक, सानुग्रह, वैद्यकीय, सदृढ बालिका, गर्भवती महिला पोषण आहार, शिष्यवृत्ती अनुदान सुध्दा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्याकरिता टाटा हॉस्पिटल कॅन्सर स्क्रिनिंग तपासणी, इतर आरोग्य विषयक तपासण्या आणि विविध वैद्यकीय उपक्रम राबविण्यात आले.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय आस्थापनेवर कार्यरत असलेल्या एम.पोलीस कार्यप्रणालीच्या माध्यमातून पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्याकरिता रजा, समाधान बक्षीस, पगार स्लिप, ई-आवास, वेलफेअर, आज्ञांकित कक्ष आदि सुविधा ऑनलाईन पध्दतीने पुरवण्यात येत आहेत. यापुढे सुध्दा नवी मुंबई पोलीस दलामधील पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्याकरिता अशाप्रकारचे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. -संजयकुमार पाटील, पोलीस उपायुक्त-मुख्यालय, नवी मुंबई.