पर्यावरणदिनीच वृक्षांची बेछूट कत्तल केल्याची तक्रार
नवी मुंबई : जुईनगर मधील सेवटर २५ येथे असणाऱ्या पारिजात गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील झाडांच्या वाढलेल्या फांद्या तोडण्याबाबत विभाग अधिकाऱ्याची परवानगी घेतली; मात्र प्रत्यक्षात झाडांची मुळे, फांद्या, त्यावरील घरटी यांची कसलीच तमा न बाळगता ४० ते ४५ झाडे तोडण्यात आल्याची लेखी तक्रार याच वसाहतीत राहणारे पर्यावरणप्रेमी आबा विठ्ठल रणवरे यांनी सहाय्यक आयुवत व विभाग अधिकारी, नेरुळ यांच्याकडे केली आहे.
विशेष म्हणजे वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन या संदर्भात नवी मुंबई महापालिका वेगवेगळे उपक्रम राबवित असताना ही घटना जागतिक पर्यावरण दिनीच घडली आहे. विभाग अधिकारी अमोल पालवे यांना आबा रणवरे यांनी प्रत्यक्ष भेटून या घडामोडीची माहिती दिली व झाडांच्या अवशेषांची विविध छायाचित्रेही सादर करीत या बाबतीत सखोल चौकशी करुन कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.