पनवेल मनपा इंग्रजी माध्यम प्राथमिक शाळा प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ
पनवेल : पनवेल महापालिका आणि आयटीच स्कुल्स यांच्या संयुक्त विद्यमातून इंग्रजी माध्यमाचे राज्य बोर्डाचे इयत्ता २ री ते ५ वी चे वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. या वर्गांमध्ये प्रवेश देण्यासाठी अर्ज मागविण्यास १० मे पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता या प्रवेश अर्ज प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली असून येत्या १६ मे पर्यंत नागरिकांनी आपल्या पाल्यांचे प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, सदर प्रवेश प्रक्रियेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत सुमारे १२० प्रवेश अर्ज भरण्यात आले आहेत.१६ मे रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत प्रवेश अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २० मे रोजी सकाळी ११ वाजता प्रवेशासाठीची लॉटरी जाहीर होणार आहे. प्रवेश अर्ज भरण्याची वेळ सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत राहील, अशी माहिती पनवेल महापालिका तर्फे देण्यात आली आहे.
सध्याच्या शैक्षणिक वर्षामध्ये आयुक्त डॉ. प्रशांत रसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता २ री ते ५ वी च्या वर्गांचे एक- एक वर्ग सुरु करण्यात येणार असून या वर्गातील ४० विद्यार्थ्यांची (२० मुले आणि २० मुली) क्षमता असणार आहे. पनवेल महापालिका हद्दीतील विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेमध्ये प्राधान्य राहणार आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी बालकाचे जन्म प्रमाणपत्र, बालकाचे आधारकार्ड, पालकाचे आधारकार्ड, मतदार ओळखापत्र आवश्यक आहे. तर पालकांचा रहिवासी पुरावा म्हणून रहिवासी दाखला, विजबील, टेलिफोन बिल, पाणीपट्टी, रेशनिंग कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पनवेल महापालिकेचा कर भरल्याची पावती, राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुक, भाडे तत्वावर राहणाऱ्या पालकांच्या बाबतीत दुय्यम निबंधक कार्यालयाचा नोंदणीकृत भाडे करारनाम्याची प्रत यापैकी कोणतेही एक कागदपत्रे आवश्यक आहेत.
यासाठीचे प्रवेश अर्ज लोकनेते दि. बा. पाटील विद्यालय, दांडेकर हॉस्पिटल आणि आगरी समाज हॉल समोर, पनवेल येथे उपलब्ध करण्यात आहेत. अधिक माहितीसाठी ७७१००८३८७७ / ९९३०११९०३० या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन पनवेल महापालिका कडून करण्यात आले आहे.