महापालिका अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त; बेकायदा फेरीवाले बिनधास्त

वाहतुकीस होणारा अडथळा आता नित्याची बाब

तुर्भे : नवी मुंबई महापालिका अधिकारी आणि कर्मचारी लोकसभा निवडणुकीत व्यस्त असल्याने नवी मुंबई शहरातील अनधिकृत बांधकाम करणारे भूमाफिया, फेरीवाले यांचे चांगलेच फावले आहे. महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या दुर्लक्षामुळे नेरुळ रेल्वे स्टेशन, जुईनगर रेल्वे स्टेशन, सानपाडा रेल्वे स्टेशन, एपीएमसी मार्केट परिसर, वाशी सेक्टर- १०, १५, १६ आदी परिसरात अनधिकृत फेरीवाल्यांनी उच्छाद मांडला आहे.

महापालिका तुर्भे विभाग कार्यालय अंतर्गत एपीएमसी भाजी मार्केटच्या विरुध्द बाजूकडील रस्ता ते धान्य मार्केटच्या आवक गेटपर्यंत २० ते २५ कांदे-बटाटे विक्रेते चक्क रस्त्याची १ लेन (मार्गिका) हडप करुन टेम्पोमध्ये मालाची विक्री करत आहेत. विशेष म्हणजे या ठिकाणी सकाळी ९ वाजल्यापासून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे कर्मचारी, १० ते १५ सुरक्षा रक्षक यांच्या तापयासह हजर असतानाही रस्ता अडवून कांदे-बटाटे विक्री करणारे टेम्पोवाले हटत नाहीत, असे चित्र नेहमी दिसते.

एपीएमसी सिग्नल ते माथाडी सिग्नल पर्यंतच्या दोन्ही बाजूंचे पदपथ फेरीवाल्यांनी व्यापले आहेत. या पदपथावर बसलेल्या फेरीवाल्यांकडून खरेदी करण्यासाठी येणारे ग्राहक तिथेच गाडी पार्क करत असल्याने अनेकदा वाहतूक कोंडी होत असते. एपीएमसी मार्केट मध्ये येणारे कामगार, खरेदीदार यांना चालण्यास पदपथ नसल्याने जीव मुठीत धरुन रस्त्यावरुन चालावे लागत आहे. परिणामी अनेकदा किरकोळ आणि गंभीर स्वरूपाचे अपघात होत आहेत. यामुळे एपीएमसी वाहतूक पोलीस विभागाकडून अनेकदा थेट फेरीवाल्यांवर कलम १०२ अन्वये गुन्हे देखील नोंद करण्यात आले आहेत. तसेच स्वतः वाहतूक पोलीस निरीक्षक विमल बिडवे यांनी अनेकदा त्यांच्या पथकासह एपीएमसी सिग्नल ते माथाडी सिग्नल पर्यंतच्या पदपथावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांना हुसकावून लावण्याचे काम देखील केले आहे. त्यामुळे महापालिका अतिक्रमण विभागाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाशी सेक्टर-९ मधील पोलीस चौकी ते जुहूगाव सेक्टर-११ पर्यंतचा पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी व्यापलेला असतो. त्यामुळे या ठिकाणाहूनही पादचाऱ्यांना जाण्यास अडथळा निर्माण होत आहे. परिणामी पादचारी रस्त्यावरुन मार्गक्रमण करीत असल्याचे चित्र दिसते.

सानपाडा सेक्टर-३/४ परिसरातील सानपाडा रेल्वे स्टेशन लगतच्या रस्त्यावर आणि पदपथावर फेरीवाल्यांनी सायंकाळच्या वेळेस बस्ताना मांडलेले असते. त्यामुळे या ठिकाणी वाहतुकीस होणारा अडथळा आता नित्याची बाब झाली आहे. 

Read Previous

नवी मुंबईतील विकासकामांना लवकरच मिळणार गती - आ.सौ.मंदा म्हात्रे

Read Next

 ‘महायुती'तील पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक संपन्न