ढिसाळ नियोजनामुळे उरणमधील ग्रामपंचायतींचा कचरा प्रश्न ऐरणीवर

उरण : देशात ‘स्वच्छ भारत अभियान'चा सर्वत्र बोलबाला आहे. मात्र, उरण मधील ग्रामपंचायतींच्या ढिसाळ नियोजनामुळे कचरा समस्येचे तीनतेरा वाजले आहेत. उरण तालुक्यात ढिसाळ नियोजनामुळे गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे.

मुंबईपासून उरण तालुका हाकेच्या अंतरावर आहे. भारतातील सर्वात मोठे महानगर असणाऱ्या मुंबई शहराजवळील, उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या हद्दीतील कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकला जात आहे. त्यामुळे रस्त्यावरुन जाणाऱ्या जनतेचा श्वास कोंडला जात आहे. प्रवाशांना नाक मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

सध्या उरण तालुक्यातील चिरनेर-कोप्रोली, चिर्ले-दिघोडे, पिरवाडी-चारफाटा, द्रोणागिरी नोड, सारडे, पिरकोन वशेणी, पुनाडे, पाणदिवे, खोपटा तसेच तालुक्यातील इतर ग्रामपंचायतींमधील नागरिक ओल्या-सुक्या कचऱ्याचे नियोजन न करता एकत्रित कचरा रस्त्यावर टाकत आहेत. ओला कचरा मोठ्या प्रमाणात कुजत असून, या कचऱ्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. या दुर्गंधीने आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या डासांमुळे साथीचे रोग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. सरकार ‘सार्वजनिक स्वच्छता'कडे लक्ष केंद्रित करत स्वच्छ भारत अभियान राबवत आहे. तर या ‘स्वच्छता अभियान'चे तीनतेरा उरण तालुक्यातील  ग्रामपंचायतींमधील नागरिक वाजवित आहेत.

विशेष म्हणजे ग्रामस्वच्छतेसाठी तालुक्यातील महसूल विभाग, पंचायत समिती प्रशासन सुध्दा ग्रामपंचायतींच्या या अस्वच्छ कारभाराला प्रतिबंध करीत नसल्याने निदर्शनास येत आहे. तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ओला कचरा- सुका कचरा वेगळा करावा, शिवाय असलेल्या ओल्या कचऱ्याचे कंपोस्टिंग करावे, अशी जनजागृती करण्यात येत नसल्याचे निदर्शनास येत आहे. वास्तविक पाहता उरण तालुक्यातील ग्रामपंचायतींना हक्काचे डम्पिंग ग्राऊंड नाही .तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात कचऱ्याचे विघटन करता येईल, अशी सेवा देखील नाही. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिक गावातील कचरा रस्त्याच्या कडेला टाकत आहेत. त्यामुळे प्रचंड अशी दुर्गंधी आणि रोगराई पसरत आहे.

‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम आणि ‘उरण पंचायत समिती'चे गटशिक्षणाधिकारी एस. पी. वाठारकर यांनी जनतेच्या आरोग्याशी निगडीत सदर प्रश्नांकडे दुर्लक्ष न करता उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. रस्त्याच्या बाजुला टाकलेला कचरा मोकाट जनावरे खात असून जनावरांच्या पोटात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक देखील जात आहे. येत्या काळात पावसाळा सुरू होणार असून सदर कचऱ्याची समस्या पावसाळ्यात अधिक गंभीर होणार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी उरण तालुक्यातील नागरिक करीत आहेत.

उरण तालुक्यात डम्पिंग ग्राऊंड विरहित कचरा व्यवस्थापनाकडे ग्रामपंचायतींची वाटचाल सुरु आहे. भविष्यातही  ग्रामपंचायतीत तरी डम्पिंग ग्राऊंड होणार नाही. त्यामुळे कचऱ्याचे विघटन कसे करावे, ओला कचरा-सुका कचरा वेगळा करावा, ओल्या कचऱ्याचे कंपोस्ट करावे आणि सुक्या कचऱ्याचे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू असे प्रयोग करुन उरण तालुक्यातील कचऱ्याचे विघटन करण्याच्या सूचना ग्रामपंचायतींना देण्यात येत आहेत. - एस. पी. वाठारकर, गटविकास अधिकारी-उरण पंचायत समिती. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी मधील नालेसफाईला अखेर मुहूर्त