एपीएमसी बाजारात हंगाम पूर्व हापूस आंब्याची विक्रमी आवक

वाशी : वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारात हंगाम पूर्व हापूस आंब्याची वावक वाढण्यास सुरुवात झाली असून, २९ जानेवारी रोजी कोकणातून ३६० पेट्या एपीएमसी बाजारात दाखल झाल्या आहेत. त्यामुळे जानेवारी महिन्यात एपीएमसी बाजारात येणारी आजवरची सदर विक्रमी आवक आहे. हापूस आंब्याला पेटीमागे ७ ते १२ हजार रुपये दर मिळत आहे, अशी माहिती ‘एपीएमसी फळ मार्केट'चे संचालक संजय पानसरे यांनी दिली.

कोकणात डिसेंबर महिन्यात हापूस आंब्याला मोठ्या प्रमाणात मोहोर येतो. मार्च महिन्यात हापूस आंबे काढणीला येतात. त्यामुळे मार्च ते मे दरम्यान दोन महिने हापूस आंब्याचा मुख्य हंगाम असतो.  या दरम्यान लाखो पेट्या बाजारात दाखल होतात. तर जानेवारी महिन्यात तुरळक हंगाम पूर्व ३० ते ४० हापूस आंबा पेट्या एपीएमसी बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र, २९ जानेवारी रोजी एपीएमसी फळ बाजारात तब्बल ३६० पेट्या कोकणातून दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हंगाम पूर्व कोकणातून जानेवारी महिन्यात दाखल होणारी सदर आवक आजवरची  विक्रमी आवक असून, चार डझन पेटीला ७ ते १२ हजार रुपये दर मिळत आहे, अशी माहिती फळ व्यापारी तथा एपीएमसी संचालक संजय पानसरे यांनी दिली आहे.

दरम्यान, हंगाम पूर्व हापूस आंबा बाजारात दाखल होत असल्याने हापूस आंबा प्रेमींची पावले देखील एपीएमसी बाजाराकडे वळू लागली आहेत.

थ्रीप्स रोगाच्या प्रादुर्भावामुळे एप्रिल मधील आवक घटणार?

वाशी मधील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याच्या एप्रिल, मे महिन्यातील मुख्य हंगामात लाखो पेट्या दाखल होत असतात. एप्रिल मध्ये काढणीला आलेल्या हापूस आंब्याला डिसेंबर, जानेवारी महिन्यात चांगला मोहोर फुटलेला असतो. मात्र, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात कोकणात अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यामुळे कोकणात सध्या आंब्यावर  थ्रीप्स  प्रजातींचा प्रादुर्भाव वाढल्याने आंबा बागेत मोहर, पालवी, फळांवर मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यंदा हापूस आंब्याच्या उत्पादनात घट होणार असल्याने बाजारात मुख्य हंगामातील हापूस आंब्याची आवक घटणार आहे, अशी माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वयाच्या ७४ मध्ये माजी विद्यार्थ्यांची सहल