मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
जागतिक पर्यावरण दिन निमित्त आंबा कोयी संकलित करण्यासाठी विशेष वाहने सज्ज
नवी मुंबई : आज ५ जून रोजी साजरा करण्यात येणाऱ्या ‘जागतिक पर्यावरण दिन'चे औचित्य साधून नवी मुंबई महापालिका तर्फे महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या संकल्पनेतून आंबा कोयी संकलनाची विशेष मोहीम राबविली जाणार असून, त्यादृष्टीने महापालिका तर्फे नियोजन करण्यात आले आहे.
नवी मुंबई शहरातील सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आदी ठिकाणांहून आंब्याच्या कोयी संकलित करण्यासाठी दोन परिमंडळांसाठी स्वतंत्र वाहन तयार करण्यात आले असून, आंबा कोयी संकलन मोहीम व्यापक प्रमाणात राबविण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
महापालिका तर्फे नागरिकांना या मोहीमेत सहभागी होण्याचे सर्व प्रसार माध्यमांतून आवाहन करण्यात आले असून, महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी आवाहन केलेली व्हिडिओ क्लिपही प्रसारित करण्यात आली आहे. महापालिकेच्या फेसबुक, टि्वटर, इन्स्टाग्राम या समाज माध्यमांवर तसेच व्हॉट्सॲप संदेशांद्वारे नागरिकांकडून या अभिनव उपक्रमाचे उत्स्फुर्त स्वागत करण्यात आले असून, नागरिक त्यांच्याकडील आंबा कोयी सुकवून महापालिकेने कोयी संकलनासाठी तयार केलेल्या विशेष वाहनात देण्यासाठी उत्सुक आहेत.
महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग द्वारे आंबा कोयी संकलनासाठी दोन विशेष वाहने सज्ज करण्यात आली असून, प्रत्येक परिमंडळासाठी स्वतंत्र वाहन कार्यरत आहे. महापालिका परिमंडळ-१ मधील वाहन बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे क्षेत्रातील तसेच परिमंडळ-२ मधील वाहन कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली, दिघा क्षेत्रातील आंबा कोयी सोसायट्यांमधून तसेच ज्युस सेंटर्स, रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स आदी ठिकाणांहून संकलित करीत आहेत. या माध्यमातून ओला, सुका आणि घरगुती घातक अशा ३ प्रकारे वर्गीकरण होणाऱ्या कचऱ्यामधील आंब्याच्या कोयींचे स्वतंत्र वर्गीकरण होऊन त्याचा उपयोग पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी होणार आहे. ‘स्वच्छ भारत अभियान' आणि ‘माझी वसुंधरा अभियान' या दोन्ही अभियानांना समर्पक असा आंबा कोयी संकलन उपक्रम आहे.
दरम्यान, नागरिकांनी त्यांच्याकडील आंब्यांचा आस्वाद घेतल्यानंतर उरलेल्या आंब्याच्या कोयी नेहमीच्या ओल्या कचऱ्यात टाकून न देता त्या एखाद्या भांड्यात पाण्याने धुवून स्वच्छ कराव्यात, उन्हात व्यवस्थित सुकवाव्यात आणि नवी मुंबई महापालिकेने कोयी संकलनाची स्वतंत्र व्यवस्था केलेल्या विशेष वाहनात त्या द्याव्यात आणि महत्वाचे म्हणजे या माध्यमातून पर्यावरण संवर्धनात आपलाही सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.