वायु प्रदुषण करणा-या केमिकल कंपनीवर कारवाई करण्यासाठी कामगारांचे मुक निषेध आंदोलन
नवी मुंबई : तुर्भे एमआयडीसीतील केमिकल कंपनीमधुन घातक रासायनिक उत्सर्जन होत असल्याने या पट्टयात असलेल्या इतर कंपन्यामधील कर्मचाऱयांना विविध प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे वायु प्रदुषण पसरवणा-या दर्शन केमिकल या कंपनीवर कारवाई करावी या मागणीसाठी तुर्भे एमआयडीसीतील कंपन्यांमध्ये काम करणा-या कामगारांनी शुक्रवारी सीबीडी बेलापूर मधील रायगड भवन येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयासमोर मुक निषेध आंदोलन केले. या आंदोलनात शेकडो कामगार सहभागी झाले होते.
तुर्भे एमआयडीसीतील दर्शन केमिकल्स या कंपनीमधुन सतत दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुके बाहेर पडत असल्यामुळे या परिसरातील संपूर्ण वातावरण प्रदूषित होत आहे. या दुर्गंधीयुक्त वायू आणि विषारी धुक्यामुळे श्वास घेण्यास त्रास होत असल्याची तक्रार या भागातील इतर कंपनीत काम करणा-या कर्मचा-यांकडुन करण्यात येत आहे. या केमिकल कंपनीतून जमिनीखाली रसायने सोडण्यात येत असल्यामुळे या केमिकल कंपनीच्या शेजारील जागेमध्ये असलेली विविध प्रकारची फळझाडे व इतर झाडे मृत झाल्याचे चैताली माटे या महिलेने सांगितले.
या कंपनीतील सांडपाण्यावर प्रक्रिया न करता सर्व सांडपाणी थेट नाल्यात सोडण्यात येत असल्यामुळे तसेच विषारी धुरामुळे या भागातील नागरिकांमध्ये विविध प्रकारचे आजार पसरत असल्याने सदर कंपनीच्या आसपासच्या परिसरात काम करणे अशक्य झाल्याच्या तक्रारी देखील कामगारांनी केल्या. दर्शन केमिकल्स या कंपनीतून बाहेर पडणा-या दुर्गंधीयुक्त असह्य वासामुळे निर्माण होणाऱया त्रासाबाबत महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे मागील ५ वर्षापासून पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र संबधित कंपनीवर आजपर्यंत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात न आल्यामुळे कामगारवर्गाकडुन हे मुक निषेध आंदोलन करण्यात येत असल्याचे बी. दत्ता यांनी सांगितले.
यावेळी आंदोलनकर्त्या कामगारांनी तुर्भे एमआयडीसीमध्ये होणरे वायु प्रदुषण बंद करा, प्रदुषण निर्माण करणाऱया कंपन्यावर कारवाई करा, आमचा परिसर प्रदुषणमुक्त करा, अशा प्रकाचे प्लग व बॅनर घेऊन मुक निषेध आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नियंत्रण मंडळाचे नवी मुंबई प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. यावेळी प्रादेशिक अधिकारी सतीश पडवळ यांनी वायु प्रदुषण पसरवणा-या दर्शन केमिकल कंपनीवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.