मिरा-भाईंदर महापालिकेत ‘सीसीटीव्ही मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्ष'
‘शासन आपल्या दारी' उपक्रमाला नवी मुंबईत उत्साही प्रतिसाद
नवी मुंबई : ‘शासन आपल्या दारी' उपक्रमाला नवी मुंबई महापालिका क्षेत्रात नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला असून ६ हजारहून अधिक नागरिकांनी उपक्रमस्थळी भेट देत सरकारच्या आणि महापालिकेच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती घेतली तर काहींनी लाभही घेतला आहे. दरम्यान, ६ फेब्रुवारी रोजी या उपक्रमाची सांगता होणार आहे.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली २० जानेवारी पासून दिघा येथून ‘शासन आपल्या दारी' ‘अभियान'ला प्रारंभ झाला असून प्रत्येक ठिकाणी नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहत सदर उपक्रम यशस्वी केला आहे.
वाशी, सेवटर-१४/१५ मधील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक भवन येथे १५ हून अधिक नागरिकांनी सहभागी होत उपक्रमाचा लाभ घ्ोतला. समाजविकास विभागाचे उपायुक्त तथा ‘शासन आपल्या दारी' उपक्रमाचे नमुंमपा स्तरीय नोडल अधिकारी किसनराव पलांडे यांनी नागरिकांचे आभार मानत जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत सदर संदेश पोहोचवून या ‘अभियान'चा लाभ घेण्याचे आवाहन केले. या उपक्रमाचे आयोजन वाशी विभागाचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी सागर मोरे आणि सहकारी अधिकारी-कर्मचारी यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता बोराडे, समाजविकास अधिकारी सर्जेराव परांडे यांनी उपस्थित राहून नागरिकांना योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहीत केले.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात सुरु झालेला ‘शासन आपल्या दारी' उपक्रम ६ फेब्रुवारी पर्यंत २८ ठिकाणी आयोजित करण्यात आला असून यापूर्वीच्या सर्वच ठिकाणी नागरिकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिलेला आहे.
यामध्ये २९ जानेवारी रोजी कोपरखैरणे, सेवटर-११ येथे सीबीएसई माध्यम महापालिका शाळा क्र.९४ या ठिकाणी ५१० नागरिकांनी तसेच महापालिका शाळा क्र.३६ आणि ३७ कोपरखैरणे गांव येथे ४५० हून अधिक नागरिकांनी उपस्थिती दर्शवत योजनांचा लाभ घेतला. ३० जानेवारी रोजी महापालिका शाळा क्र.३३ पावणे गांव येथे २०२ तर शाळा क्र.४० महापे गाव या ठिकाणी २९५ नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. ३१ जानेवारी रोजी तुर्भे विभाग कार्यालयातील सानपाडा येथील सभागृहात १७२ जणांनी तसेच आयसीएल शाळा तुर्भे येथे ४३३ जणांनी उपक्रमाचा लाभ घेतला. १ फेब्रुवारी रोजी तुर्भे बगाडे कंपनीसमोरील मोकळी जागा इंदिरानगर येथे ४३६ तर कोपरीगाव मैदान येथे ४२३ नागरिकांनी सहभाग नोंदविला.
महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आलेला ‘शासन आपल्या दारी' उपक्रम सर्वच ठिकाणच्या नागरिकांनी उत्तम प्रतिसाद देत यशस्वी केला असून उपक्रमांच्या आयोजनामध्ये सर्वच विभागांना समान संधी उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. शासनाच्या निर्देशानुसार नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रास न होता सरकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या घराजवळ मिळावा यादृष्टीने ‘शासन आपल्या दारी' असा अभिनव उपक्रम संपूर्ण राज्यात राबविला जात आहे. शासकीय योजना लोकाभिमुख व्हाव्यात आणि त्याची कालमर्यादित गतीमान अंमलबजावणी व्हावी या दृष्टीने राबविण्यात येणाऱ्या सदर उपक्रमास नागरिकांचा मोठ्या संख्येने मिळणारा सहभागाचा प्रतिसाद या उपक्रमाची यशस्वीता वाढविणारा आहे.
महाराष्ट्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा यादृष्टीने ‘योजना कल्याणकारी, सर्वसामान्यांच्या दारी' असे उद्दिष्ट घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभरात सुरु असलेल्या ‘शासन आपल्या दारी' उपक्रमाला नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात नागरिकांचा उत्साही प्रतिसाद लाभत आहे. जास्तीत जास्त लाभार्थी नागरिकांनी याचा उपयोग करुन घ्यावा. -राजेश नार्वेकर, आयुवत-नवी मुंबई महापालिका.