ठाणे शहरातील नवीन बांधकामांना महापालिकेचे पाणी वापरण्यास मनाई

ठाणे ः ठाणे महापालिका हद्दीतील नवीन बांधकामांना परवानगी देताना भूजल किंवा महापालिकेचे पाणी वापरण्यास मनाई करण्यात येणार असून, बांधकाम व्यतिरिक्त इतर कामांसाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी एसटीपी प्लांटवर टँकर फिलिंग पॉईंट तयार करण्याची सूचना महापालिका अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, असे अशी माहिती ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.

पाणी बचत होण्यासाठी पाणी वितरण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.ठाणे महापालिका क्षेत्रात आणि विशेष करुन घोडबंदर भागात भविष्यात पाण्याची गरज दुप्पट होणार आहे. ठाणे महापालिकेचे  स्वतःचे हक्काचे धरण नसल्याने आजही महापालिकेला इतर स्त्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. ठाणे शहराला सध्या बृहन्मुंबई महापालिका, एमआयडीसी, स्टेम आणि ठाणे महापालिकेची स्वतः ची पाणी पुरवठा योजना यांद्वारे दररोज एकूण ५८२ एमएलडी पाणी उपलब्ध होते. मात्र, भविष्यातील पाण्याची गरज पाहता सध्या महापालिकेला उपलब्ध होणारे पाणी अतिशय अपुरे पडणार आहे. महापालिका द्वारे ३२६ एमएलडी सांडपाण्यावर दररोज सेकंडरी ट्रीटमेंट करुन सदर पाणी खाडीत सोडले जाते. भविष्यातील पाण्याची गरज ओळखून यापुढे ठाणे महापालिका क्षेत्रातील नवीन इमारत बांधकामाला परवानगी देताना भूजल किंवा ठाणे महापालिकेच्या पाण्याचा वापर न करणे बंधनकारक करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सांगितले.

महापालिका तर्फे पाणी वापर धोरण निश्चित करताना गार्डनसाठी, गाड्या धुण्यासाठी, सिव्हिल वर्कसाठी वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करण्याचे बंधन घालण्यात येणार आहे. यासाठी एसटीपी प्लांटचे सक्षमीकरण करुन एसटीपी प्लांट मधील पाण्याचा वापर कसा करता येईल, यावर भर दिला जाणार आहे. याशिवाय एसटीपी प्लांटवर टँकर फिलिंग पॉईंट तयार करण्यात येणार आहे, असे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्पष्ट केले.     

 ठाणे महापालिका क्षेत्रातील काही भागात काही प्रमाणात पाणी टंचाई जाणवू लागली असली तरी यापुढे किमान एक ते सव्वा महिना तरी पाणी कपात करण्यात येणार नाही. पाणी वितरण व्यवस्था सुधारण्याबरोबरच पाणी  बचत आणि काटकसर यावर विशेष भर देण्यात येणार आहे. दिवा भागातील पाणी प्रश्नासंदर्भात लवकरच उपाय योजना करण्यात येणार आहे. - सौरभ राव, आयुक्त - ठाणे महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सुदामा सोसायटी स्लॅब दुर्घटना प्रकरण