मानखुर्द वाशी रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वे रुळावर अज्ञात व्यक्तीने टाकला लोखंडी पाईप
नवी मुंबई : हार्बर रेल्वे मार्गावरील मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळच्या रेल्वे रुळावर एका अज्ञात व्यक्तीने लोखंडी पाईप टाकल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. सुदैवाने लोकलच्या मोटरमनला हा पाईप निदर्शनास आल्याने मोटरमनने प्रसंगावधान दाखवत लोकल जागेवर थांबवून रुळावर पडलेला भला मोठा लोखंडी पाईप हटवला. त्यानंतर त्याने लोकल पनवेलच्या दिशेने नेली. मोटरमनला रुळावर पडलेला लोखंडी पाईप निदर्शनास आला नसता, तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी भिती व्यक्त करण्यात येत आहे. आरपीएफने रेल्वे रुळावर पाईप टाकणाऱया अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करुन त्याचा शोध सुरु केला आहे.
मानखुर्द रेल्वे स्थानकालगत असलेल्या महाराष्ट्र नगरमधील रहिवाशी ज्या ठिकाणी रेल्वे रुळ ओलांडून जात असतात, त्याच क्रॉसिंगच्या ठिकाणी रेल्वे रुळावर सोमवारी रात्री पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने कन्स्ट्रक्शनच्या कामात वापरण्यात येणारा भला मोठा लोखंडी पाईप टाकुन पलायन केले होते. याचदरम्यान सीएसएमटी येथून पनवेल येथे जाणारी लोकल मानखुर्द रेल्वे स्थानकातून वाशीच्या दिशेने निघाली असताना, लोकलच्या मोटरमनला रेल्वेच्या रुळावर पडलेला भला मोठा लोखंडी पाईप निदर्शनास आला. त्यामुळे मोटरमनने प्रसंगावधान दाखवत जागेवरच लोकल थांबवली.
त्यानंतर मोटरमनने रुळावर पडलेला लोखंडी पाईप हटवून याबाबतची माहिती आरपीएफ व रेल्वे पोलिसांना दिल्यानंतर सदर लोकल पनवेलच्या दिशेने नेली. या घटनेची माहिती मिळताच मानखुर्द आरपीएफच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर पाईप ताब्यात घेतला आहे. सदर लोखंडी पाईप घेऊन जाणारा व्यक्ती रेल्वे रुळ ओलांडून जात असताना अचानक लोकल आल्याने त्याने रेल्वे रुळावर लोखंडी पाईप टाकुन पळ काढला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सदर ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नसल्यामुळे या आरोपीला शोधण्यात आरपीएफच्या जवानांना अडचणी येत आहेत.
दिपक सोनटक्के (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-मानखुर्द आरपीएफ)
मानखुर्द रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळावर लोखंडी पाईप टाकून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱया अज्ञात व्यक्ती विरोधात कलम 153, 147 रेल्वे ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्याचा शोध घेण्यात येत आहे. सदर लोखंडी पाईप हा कन्स्ट्रक्शनच्या कामात वापरातला असून तो घरगुती वापरासाठी नेला जात असावा.