घाऊक बाजारात ‘मेथी' दरात घसरण

वाशी : मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे पालेभाजी पिकांवर मोठा परिणाम झाला होता.त्यामुळे बाजारात ‘मेथी'ची आवक घटून मेथी जुडी दरात वाढ  होऊन घाऊक बाजारात ‘मेथी'ची एक जुडी २५ रुपयांवर तर किरकोळ बाजारात ४५ ते ५० रुपये दराने मेथी जुडी विकली जात  होती. मात्र, आता पालेभाजी पिकाला पोषक वातावरण तयार झाल्याने पालेभाजी आवक वाढली आहे. त्यामुळे पालेभाजी दरात प्रचंड घसरण  झाली आहे. घाऊक बाजारात सध्या ५ ते ७ रुपये दराने मेथी जुडी विकली जात आहे.

हिवाळा ऋतुंच्या दिवसात सर्वात जास्त खाल्ली जाणारी पालेभाजी म्हणून ‘मेथी'ची ओळख आहे. हिवाळ्यातील वातावरण वाढीसाठी पोषक असल्याने ‘मेथी'ची लागवड इतर ऋतुंच्या तुलनेत वाढते. मात्र, मागील महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसाचा फटका मेथी पिकाला बसला होता. महाराष्ट्रात सर्वाधिक मेथी भाजीचे पीक पुणे आणि नाशिक जिल्ह्यामध्ये घेतले जाते. अवकाळी नंतर राज्यात थंडी कायम राहिली आहे. त्यामुळे पालेभाजी पिकाला आता पोषक वातावरण तयार झाल्याने पालेभाजी उत्पादन वाढले आहे. परिणामी वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) भाजीपाला बाजारात सध्या ‘मेथी'ची प्रचंड आवक वाढली आहे.

२ फेब्रुवारी नाशिक मधून एपीएमसी भाजीपाला बाजारात २७ वाहनांमधून ७०,५०० क्विंटल मेथी आवक झाली होती. आवक वाढल्याने मेथी जुडी दरात देखील घसरण झाली असून, घाऊक बाजारात प्रती मेथी जुडी ५ ते ७ रुपये दराने विकली जात आहे, अशी माहिती वाशी सेवटर-१७ येथील भाजीपाला मार्केट मधील व्यापारी रवि गुप्ता यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 परदेशी पाहुण्यांचे आगमन!