फादर ॲग्नेल स्विमिंग पूल मधील विद्यार्थ्याचे मृत्यूप्रकरण

नवी मुंबई : वाशीतील फादर ॲग्नेल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या मयुर आदिनाथ डमाळे (17) या विद्यार्थ्याचा गत आठवडयात फादर ॲग्नेल ज्युनियर कॉलेज मधील स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झाला होता. त्यानंतर वाशी पोलिसांनी केलेल्या तपासात मयुरचा मृत्यू स्विमींग पुलमधील स्विमींग कोच, तसेच 4 लाईफ गार्ड यांच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे आढळुन आले आहे. त्यामुळे वाशी पोलिसांनी स्विमींग कोचसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  

वाशीतील फादरॲग्नेल महाविद्यालयात अकरावीत शिक्षण घेणारा मयुर डमाळे हा विद्यार्थी नेरुळमध्ये राहत होता. गत आठवडयात 13 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास मयुर त्याच्या वर्गातील इतर विद्यार्थ्यासह वाशीतील फादर ॲग्नेल ज्युनियर कॉलेज मधील स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेला होता. यावेळी स्विमींग पूलमध्ये पोहताना मयुर अचानक बुडाला होता. त्यावेळी मयूरला तात्काळ बाहेर काढण्यात आल्यानंतर त्याला कृत्रिम श्वास देऊन रुग्णालयात नेण्यात आले होते, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर वाशी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करुन स्विमींग पुल आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.  

या तपासात स्विमींग पुलमधील स्विमींग कोच व लाईफ गार्डसचे मयुरवर काळजीपुर्वक लक्ष ठेवणे हे त्यांचे कर्तव्य असताना, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे मयुरचा स्विमींग पुलमध्ये पोहोताना बुडून मृत्यू झाल्याचे आढळुन आले. त्यामुळे वाशी पोलिसांनी स्विमींग कोच लक्ष्मणसिंग काळुसिंग ठाकुर व लाईफ गार्ड आकाश बाळु देवाडे, सुरजकुमार अशोककुमार चौधरी, ओमगोविंद श्यामकिशोर यादव व सागर रावसाहेब शिवशरण या पाच जणांना मयुरच्या मृत्यूला जबाबदार धरुन त्यांच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कार्यवाहीला सुरुवात केली आहे.  

Read Previous

तुर्भे विभागाकडून अनधिकृत फेरीवाल्यांवर धडक कारवाई

Read Next

पाण्याच्या टाकीचे बांधकाम सुरु असलेल्या स्लॅबवरुन पडुन कामगाराचा मृत्यू,