अनधिकृत बांधकामांवर १५ एप्रिल पासून पुन्हा कारवाई
ठाणे : धोकादायक इमारती रिकाम्या करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्य पध्दती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
दरम्यान, नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून १५ एप्रिल पासून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुन्हा सुरु करण्याच्या सूचनाही आयुवत राव यांनी दिल्या आहेत.
महापालिका आयुक्त सौरभ राव प्रत्येक प्रभाग समिती कार्यालयाला भेट देवून तेथील कार्यपध्दती जाणून घेत आहेत. या अंतर्गत १२ एप्रिल रोजी आयुक्त राव यांनी मुंब्रा आणि दिवा या दोन प्रभाग समितीची माहिती घेतली. मुंब्रा प्रभाग समिती कार्यालयात झालेल्या बैठकीप्रसंगी अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिमंडळ-१चे उपायुक्त मनिष जोशी, सहायक आयुक्त (मुंब्रा) बाळू पिचड, सहायक आयुक्त (दिवा) अक्षय गुडदे तसेच सर्व वरिष्ठ अधिकारी आणि विभागप्रमुख उपस्थित होते.
गेल्या १५ महिन्यात मुंब्रा भागात अनधिकृत बांधकामांची संख्या ४० होती. त्यापैकी ८ इमारती पाडण्यात आल्या असून १४ इमारती पाडण्याची कार्यवाही सुरु आहे. तर १८ इमारतीमध्ये कुटुंबे राहत आहेत. मुंब्रा येथील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींची संख्या मोठी आहे. त्यामध्ये अती धोकादायक ६ इमारती आहेत. त्यापैकी ४ इमारती रिकाम्या असून २ अजुनही व्याप्त आहेत. १०० धोकादायक इमारती असून त्यातील ८ इमारतींची दुरुस्ती झाली आहे. २३ इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल आले असून त्या दुरुस्त करण्यासाठी संबंधितांना नोटिसा देण्यात आल्या आहेत. ५७ इमारतींचे दुरुस्ती काम संथ गतीने सुरु आहे. तर ९ ठिकाणी काम सुरच झालेले नाही. ३ इमारती रिक्त करण्यात आल्या आहेत. तसेच ३५० इमारतींची त्या व्याप्त असतानाच दुरुस्ती करायची आहे. तर ८८४ इमारतींची किरकोळ दुरुस्ती आवश्यक आहे.
गेल्या १५ महिन्यात दिवा येथील २७३ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात १८७ इमारती अजुनही व्याप्त आहेत. ३२ इमारती पाडण्यात आल्या असून ५४ अव्याप्त इमारती निष्कासन करण्याची कार्यवाही सुरु आहे. अती धोकादायक किंवा धोकादायक स्थितीत एकही इमारत दिवा येथे नाही. ६७ इमारतींना मोठ्या तर ५८५ इमारतींना किरकोळ दुरुस्तीच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मुंब्रा आणि दिवा प्रभाग समिती यांची प्रस्तावित नवीन कार्यालये, देसाई खाडी पुल, त्यांचे पोहचमार्ग, दिवा रेल्वे उड्डाणपुल, दिवा येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, नाल्याची कामे, जलकुंभ आदि कामांची आयुक्त राव यांनी विस्तृत माहिती घेतली. बैठकीनंतर आयुक्त राव यांनी कौसा येथील स्वातंत्र्य सेनानी हकीम अजमल खान रुग्णालयाची पाहणी केली. तेथे सध्या सुरु असलेल्या ओपीडी सेवांची पाहणी केली. तसेच नियोजनबध्द काम करून सदर रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकरात लवकर कार्यान्वित करण्याच्या सूचनाही आयुक्त राव यांनी दिल्या.
मुंब्रा येथील एकूण ६६ धोकादायक इमारतींबाबत तातडीने निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. या इमारतींची सहायक आयुक्त आणि कार्यकारी अभियंता यांच्या टीमने तातडीने पाहणी करावी. ज्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवाल परस्पर विरोधी आले आहेत. त्या इमारतींची पाहणी ते दोन्ही स्ट्रक्चरल ऑडिटर आणि महापालिकाने नियुक्त केलेले त्रयस्थ ऑडिटर यांनी संयुक्तपणे करुन अहवाल द्यावा. येत्या काही दिवसात सदरची कार्यवाही पूर्ण करावी. जे स्ट्रक्चर ऑडिटर दिशाभूल करणारा अहवाल देतील, त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्यात येईल. -सौरभ राव, आयुवत-ठाणे महापालिका.